Nagaran Manjule: ...तर इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, नागराज अण्णाने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:50 PM2022-05-08T18:50:47+5:302022-05-09T10:30:37+5:30
सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे : सावंतवाडीत जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग/सावंतवाडी : माणसा माणसातील संवाद तुटला की गैरसमज निर्माण होत असतात. जर हे गैरसमज थांबवायचे असेल तर बोलत राहा, आग लागली तर घागर घेऊन आगीवर पाणी मारुन ती विझवा. कारण, इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, पेटवणारे होऊ नका असे मत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर माडले. मंजुळे यांनी कोणाचेही नाव न घेता आपले विचार मांडले.
सावंतवाडीत रविवार पासून येथील आरपीडी हायस्कूलच्या गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनाचे अनोख्या पध्दतीने उद्घाटन सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, काँग्रेस नेते विकास सावंत किशोर जाधव, सुबोध मोरे, चंद्रकांत जाधव, आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना मंजुळे म्हणाले, समाजातील संवाद संपत चालला असताना अशी संमेलन झाल्याने त्यातून एक उर्जा मिळत असते. मी प्रत्येक संमेलनाला मुद्दामहून जात असतो. यातून संवाद वाढत जात असतो आपापसातील संवाद संपला की गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी बोलत राहणे गरजेचे आहे. माणसातील माणूसपण टिकवता आले पाहीजे. केशवसुतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सावंतवाडीत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आहे. या ठिकाणावरुन बर्याचदा गेलो, पण साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने सावंतवाडीसाठी येण्याचे भाग्य लाभले, असेही मंजुळे यांनी यावेळी म्हटले. केशवसूताच्या अनेक कविता वाचल्या पण त्यांनी ज्ञानदान केलेल्या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले असे म्हणत अनेक रत्नाच्या पदस्पर्शाने सावंतवाडीची भूमी पुनीत झाली आहे. याठिकाणी साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने आल्यानंतर एक वेगळे अनुभव आले.
संमेलनाध्यक्षा सध्या नरे-पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर भाष्य करताना या व्यवस्थेला सर्वसामान्य कंटाळला असून, आपल्या विचारांचे नाही ते नास्तिक असल्याचे ठरवले जात आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजान विरोधात हनुमान चालिसा म्हणायला सांगितली, वेद मंत्र का नाही असा सवाल करत त्यांना आता सर्वत्र तेढ निर्माण करायचा आहे. त्यांचे स्क्रिप्ट कोठून येते ते सर्वानाच माहित आहे, असे म्हणत प्रसारमाध्यमांनी एक किल्ली न बनता सर्वसमावेशक बनले पाहिजे असेही नरे-पवार यांनी म्हटले.
दरम्यान, या निमित्ताने स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्यासह लेखक चंद्रकांत जाधव, सुबोध मोरे, किशोर जाधव, विकास सावंत यांनी विचार मांडले संमेलनाचे प्रास्ताविक संपत देसाई यांनी केले तर आभार मधुकर मातोंडकर यांनी माडले आजरा येथील प्रा.नवनाथ शिंदे, सिध्दार्थ देवधेकर, दुर्गादास गावंडे यांचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.