डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:05 PM2023-02-03T16:05:39+5:302023-02-03T16:06:20+5:30

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल

Naib Tehsildar, talathi beaten up by dumper businessmen, incident in Kudal Sindhudurga | डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना

डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना

googlenewsNext

कुडाळ : अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना रोखून त्यांना वाहतुकीसंदर्भातील पास विचारले असता, या अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी कुडाळ तहसील कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड यांना कुडाळ येथील औदुंबरनगर येथे मारहाण केली. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या अनधिकृत वाळू उपसा व या वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अनुषंगाने कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके नेमली आहेत. यामधील १ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व आंब्रड येथील तलाठी नवीन राठोड यांची नेमणूक केली होती.

या पथकाने खासगी चारचाकी गाडीच्या माध्यमातून सोनवडे येथे नदीकिनारी वाळू उपसा होत आहे की नाही, याची पाहणी केली ही पाहणी केल्यानंतर ते कुडाळच्या दिशेने येत असताना त्यांना कुडाळ केळबाईवाडी येथील स्मशानभूमीच्याजवळ एका डंपरमधून पाणी रस्त्यावर पाजरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन या डंपर आला थांबवले. हा डंपर थांबवल्यानंतर मागवून येणारे डंपर त्या ठिकाणी थांबले. त्यांच्याजवळ पासची मागणी केली असता कोणत्याही वाहतुकीचे पास या डंपर व्यवसायिकांकडे नव्हते. यामध्ये डंपर व्यावसायिक व महसूलच्या या पथकामध्ये बाचाबाची झाली.

या डंपरवर कारवाई होणार हे लक्षात आल्यावर प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व तलाठी नवीन राठोड यांना व्यावसायिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तलाठी नवीन राठोड यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. ही घटना समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाणे येथे तहसीलदार अमोल पाठक व तलाठी सोनावणे दाखल झाले. या मारहाण करणाऱ्या वाळू व डंपर व्यावसायिकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई सुरू राहणार

अनधिकृत गौण खनिज उत्खनन व अनधिकृत गौण खनिज वाहतूक होत असेल तर कारवाई करण्यात येईल. तसेच यावेळी कोणी ही दमदाटी किंवा इतर अडथळा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया तहसीलदार अमोल पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, तहसीलदार रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना उपस्थित होते.

मारहाण करणाऱ्यांवर झाले गुन्हे दाखल

विविध कलमांन्वये अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर,  अमोल ठाकूर,  अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब, साई अणावकर यांच्यासह अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या डंपरचा समावेश

ज्या डंपरमधून अनधिकृत वाळू वाहतूक होत होती आणि हे डंपर अडवण्यात आले होते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर या डंपरांचे पलायन करण्यात आले. यामध्ये (एमएच- ४३ वाय- ४५०१), (एमएच- ०७ सी- ५२४२), (एमएच ०७ एजे- ६०७३),  (एमएच- ०७ एक्स - ०५८८) या डंपरांचा समावेश होता.
 

Web Title: Naib Tehsildar, talathi beaten up by dumper businessmen, incident in Kudal Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.