कोकिसरेत चोरट्याचा दीड लाखावर डल्ला
By admin | Published: January 27, 2017 11:24 PM2017-01-27T23:24:32+5:302017-01-27T23:24:32+5:30
सव्वा चार तोळ््याचे दागिने लंपास : श्वानपथक घटनास्थळावर घुटमळले; दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश
वैभववाडी : कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयानजीक शिवसेनेचे श्रीराम शिंगरे राहत असलेल्या घरात चोरट्याने डल्ला मारला. चोरट्याने ३ दरवाज्यांची कुलपे तोडून शिंगरे यांच्या कपाटातील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने व १६ हजारांची रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांचे श्वान घटनास्थळाहून मुरकर इमारत व तेथून महालक्ष्मी पेट्रोल पंपावर जाऊन घुटमळले.
अधिक वृत्त असे की, माधवराव पवार विद्यालयाचे गुरुवारी स्नेहसंमेलन होते. त्यामुळे शिंगरे कुटुंबिय स्नेहसंमेलनाला गेले होते. ही संधी साधून चोरट्याने शिंगरे भाड्याने राहत असलेल्या घरात डल्ला मारला. मध्यरात्री शिंगरे कुटुंबिय स्नेहसंमेलनाहून घरी आल्यावर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. अंगणातील लाईट चालूच होता. तरीही पुढील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर शिंगरेंच्या खोलीचे कुलूप तोडून पर्समधील किल्लीने लोखंडी कपाट उघडले.
कपाटाच्या तिजोरीत तीन तोळ्याचे मंगळसूत्र, चार ग्रॅमच्या कानातील दोन रिंग, दोन ग्रॅमच्या दोन रिंग असे चार तोळे दोन ग्रॅम वजनाचे सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व सिलिंडर विक्रीची १६ हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली. त्यानंतर त्याने शिंगरे यांच्या घरमालकाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटातील किल्लीने तिजोरी उघडली. मात्र, चोरुन नेण्यासारखे तेथे काहीच नव्हते. त्यामुळे घराचा मागील दरवाजाने चोरटा निघून गेला. श्रीराम शिंगरे यांनी पहाटे या घटनेची पोलिसात तक्रार दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस मुख्यालयातून श्वान पथकास पाचारण केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील वस्तूंचा वास दिल्यावर श्वान मागील दरवाजाने बाहेर पडले. तेथून विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन वैभववाडी-तळेरे रस्त्यावरुन मुरकर इमारतीत गेले. तेथून ते महालक्ष्मी पेट्रोल पंपावर जाऊन घुटमळले. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही. गेल्या सव्वा महिन्यातील ही दुसरी मोठी घरफोडी असल्याने जनतेत भीतीचे वातावरण असून पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. (प्रतिनिधी)