अवैध धंद्यांची माहिती द्या, पोलीस नावाबाबत गुप्तता ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 04:34 PM2020-10-29T16:34:43+5:302020-10-29T16:37:32+5:30
police, sindhudurgnews अवैध धंद्यांबाबत नागरिकांना माहिती असेल तर त्यांनी मला माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी सांगितले.
सावंतवाडी : आंबोली घाटात महिलेच्या मिळालेल्या मृतदेहाबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पोलीस अधीक्षकांनीही आढावा घेतला. तसेच तपास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून, मीही माहिती घेत आहे. त्यामुळे जर यात कोणाचा सहभाग असेल तसेच या प्रकरणातील कारचा मालक वेगळा असेल तर आम्ही त्यांची पूर्ण चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू, असे सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी सांगितले. तसेच अवैध धंद्यांबाबत नागरिकांना माहिती असेल तर त्यांनी मला माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडीच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांंनी प्रथमच पत्रकारांंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या अवैध धंद्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जनतेने जागरूक राहिले पाहिजे, असे मत मांडले. मी आल्यावर एका ठिकाणी अवैध दारूवर कारवाई केली आहे. नागरिकांनी माहिती दिली तर आम्ही आणखी कारवाई करू असे सांगितले.
तसेच सावंतवाडी तालुक्यात होणारी अवैध दारू वाहतूक आणि वाहनांवरील काळ्या फिल्मबाबतही लवकरच धडक मोहीम राबविणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले. सावंतवाडीत काही अवैध व्यावसायिक विशिष्ट जागांवर बसून असतात याची माहिती मिळाली आहे. याबाबत लवकरच शहरात फिरून माहिती घेणार आहे. तसेच अवैध धंद्यांबाबत धडक मोहीम राबविणार असल्याचेही सोळंके यांनी सांंगितले.
आंबोलीच्या तपासाकडे विशेष लक्ष ठेवणार
आंबोली येथे एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी माहिती घेतली. तसेच तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या आहेत. जर या प्रकरणात वापरलेली कार अन्य कोणाची असेल तर त्याची चौकशीही लवकरच केली जाईल, असे डॉ. सोळंके यांनी सांगितले. पोलीस कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालणार नसून या तपासाकडे विशेष लक्ष ठेवणार, असे त्यांनी सांगितले.