पुणे विद्यापीठ नामकरण

By Admin | Published: July 8, 2014 10:45 PM2014-07-08T22:45:45+5:302014-07-08T23:52:18+5:30

नायगाव ग्रामपंचायतीची विशेष सभा

Naming the University of Pune | पुणे विद्यापीठ नामकरण

पुणे विद्यापीठ नामकरण

googlenewsNext

खंडाळा : स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक आणि सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगावसह खंडाळा तालुक्यात जल्लोष करण्यात आला.
शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योतीच्या अद्वितीय कार्याचा हा सन्मान असल्याच्या भावना ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केल्या. नायगाव ग्रामपंचायतीने विशेष सभा घेऊन राज्यसरकारचा अभिनंदनाचा ठरावही संमत केला.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याचा ठराव सिनेटने मंजूर केला होता. राज्य मंत्रिमंडळासमोर गेल्या आठवड्यात नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे राज्यातील समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. महात्मा फुले समता परिषद व नायगाव ग्रामस्थांनी या घटनेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये सभा घेऊन महाराष्ट्रभर चळवळ उभारण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दि. ७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा या प्रस्तावावर चर्चा होऊन पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या विद्यापीठाचे नाव आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे होणार आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती मिळताच जन्मभूमी नायगाव येथे महिलांनी व ग्रामस्थांनी फुले स्मारकास अभिवादन करून व पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी ग्रामस्थांच्या विशेषत: महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नायगावच्या पवित्र भुमिचे आपण नागरिक असल्याचा सार्थ अभिमानही लोकांमध्ये दिसून येत होता.
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने खंडाळा तालुक्यातील गावोगावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोणंद, अंदोरी, म्हावशी, वाठार बुद्रुक, शिरवळ, सुखेड, अहिरे, खंडाळा आदी प्रमुख गावांसह तालुक्यात एकच जल्लोष करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Naming the University of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.