Sindhudurg: नाना पाटेकरांचा बंगला कुठे आहे विचारत घरात घुसले, अज्ञात चोरट्यांनी वयोवृद्धाला लुटले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 9, 2024 04:14 PM2024-01-09T16:14:31+5:302024-01-09T16:14:50+5:30
दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले
आचरा : अभिनेते नाना पाटेकर यांचा बंगला कुठे आहे, अशी विचारणा करत एका वयोवृद्धाला अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लुटले. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करत घराला बाहेरून कडी लावून पोबारा केला. घाबरलेल्या वयोवृद्धाने पोलिसांना कल्पना दिली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा माग लागला नव्हता. ही घटना रविवारी रात्री आचरा वरचीवाडी येथील मारुती घाटी मार्गावर घडली. याप्रकरणी आचरा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचरा मारुती घाटी येथील येथे घरात वयोवृद्ध मारुती वामन वाडेकर हे एकटेच राहतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या घरात रविवारी सायंकाळी टीव्हीवर बातम्या बघत बसले होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे बंद दार कोणीतरी ठोठावले. बाहेर कोण आले आहे हे बघण्यासाठी त्यांनी अर्धवट दार उघडून बघितले असता दोन व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी नाना पाटेकरचा बंगला कुठे आहे, अशी विचारणा केली. आम्हाला बाहेर येऊन पत्ता सांगा असे सांगू लागले. मात्र वाडेकर हे बाहेर येत नाहीत असे बघून त्या दोन चोरट्यांनी वाडेकर यांना जोरदार धक्का देत आत ढकलून घरात प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठी हुसकावून घेतली.
वाडेकर यांना धाक दाखवत घरातील पैसेही देण्यास भाग पाडले. घरात खोल्यांमध्ये शोधाशोध करत त्यांना ढकलून देत घराचे दर्शनी भागाचा दरवाजा बाहेरून बंद करत चोरटे पसार झाले. या घटनेनंतर वाडेकर यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना फोनवरून घडलेला प्रकार सांगून याची माहिती आचरा पोलिसांना दिली. वाडेकर यांची चोरट्यांनी १४ हजार रुपये किमतीची सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, घरातील अंदाजित पाच हजार रुपये रोख रक्कम असे सुमारे २४ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. याप्रकरणी आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर हे अधिक तपास करीत आहेत.
श्वान, ठसे तज्ज्ञ पथक दाखल
दोन युवक हे रविवारी सायंकाळपासून मारुती घाटी परिसरात दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. वाडेकर हे घरात एकटे असल्याचे त्यांची खात्री झाल्याने त्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून दागिने, रोख रकमेवर डल्ला मारला. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने वळवली असून, सोमवारी दुपारी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. चोरीच्या पार्श्वभूमीवर आचरा येथे उपविभागीय पोलिस अधीक्षक तसेच श्वान व ठसे तज्ज्ञ पथक दाखल झाले होते.