nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:58 PM2022-03-31T13:58:43+5:302022-03-31T13:59:07+5:30
भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला.
कणकवली : रिफायनरी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावरुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणेंनी काँग्रेस आणि स्वाभिमानमध्ये असताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांनी ग्रीन रिफायनरीबाबत आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे.
पक्ष बदलला की तत्वे बदलणाऱ्या आणि पक्षाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणाऱ्या राणेंनी मतांवर डोळा ठेवून रिफायनरीला विरोध केला होता हे आठवावे असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंना लगावला.
तर, राजापूरच्या ग्रीन रिफायनरीला जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला होता. आता ग्रीन रिफायनरीला काहींचे समर्थन आणि काहींचा विरोध अशी जनतेची भावना आहे. शिवसेना ग्रीन रिफायनरीबाबत जनतेसोबत होती आणि यापूढेही राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, संतोष परब, सचिन सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले, यापूर्वी देवगडमध्ये नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरीमुळे जनतेला कॅन्सर होईल असे वक्तव्य केले होते. मग आता हा प्रकल्प करताना कॅन्सर कसा होणार नाही? हेही जनतेला सांगावे. नितेश राणेंच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील या अगोदरची भाषणाची वृत्तपत्रातील कात्रणेच सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. ते म्हणाले, रिफायनरीचे दलाल म्हणून प्रमोद जठार यांना हिणवणाऱ्या नितेश राणेंनी आता त्यांचेच नेतृत्व रिफायनरी साठी मान्य केले आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडमध्ये राज्य शासनाने दिलेल्या निधीच्याच कामांचे भूमिपूजन केले. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आपल्या सोयिस्कर बदलत्या भूमिकेबद्दल आधी बोलावे. केंद्रातून त्यांनी किती निधी आणला ते जनतेला सांगावे. सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
देवगडमध्ये शिवसेनेचा आवाज वाढला असे म्हणणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून मांजरीचा की वाघाचा ? अशा खोचक सवालाने भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले होते. यावर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना उद्देशून सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा पलटवार केला. भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा असल्याचा पलटवार सतीश सावंत यांनी यावेळी केला.