Narayan Rane : नाणार रिफायनरी आहे त्याच जागी होणार - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:25 AM2021-10-30T06:25:57+5:302021-10-30T06:26:37+5:30
Narayan Rane : राणे म्हणाले, सी वर्ल्ड व नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांनी विरोध केला; मात्र हे प्रकल्प ज्या ठिकाणी ठरले आहेत, त्याच जागी केले जाणार आहेत.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : कोणीही, कितीही, काहीही करा; मालवण येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प व राजापूर येथील नाणार रिफायनरी प्रकल्प हे आहे त्याच जागी हाेणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते बोलत होते.
राणे म्हणाले, सी वर्ल्ड व नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांनी विरोध केला; मात्र हे प्रकल्प ज्या ठिकाणी ठरले आहेत, त्याच जागी केले जाणार आहेत. हे दोन्ही प्रकल्प कुठेही स्थलांतरित केले जाणार नाहीत. कोणीही, कितीही विरोध केला तरी तो बाजूला केला जाईल.सूक्ष्म, लघू, मध्यम खात्याचे सर्व अधिकारी दिवाळीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार आहे.
ज्या लाेकांना उद्योग-व्यवसाय करायचे असतील त्यांनी त्याबाबत त्यांच्याकडे नोंदणी करावी, तसेच कुडाळ तालुक्यात दोनशे कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र लवकरच तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अनिल परब शिवसेनेत ‘कलेक्टर’
एस.टी. कर्मचाऱ्यांची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. परिवहन मंत्री अनिल परब शिवसेनेत ‘कलेक्टर’ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कर्मचारी काय अपेक्षा करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.