सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ गड-किल्यांमध्ये नांदगाव किल्ल्याचाही समावेश
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 2, 2023 01:09 PM2023-11-02T13:09:48+5:302023-11-02T13:10:29+5:30
कोटाचा माळ येथे घोडे बांधण्याची जागा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन दप्तरी असलेल्या ३८ गड-किल्ल्यांमध्ये कणकवली तालुक्यातील नांदगाव किल्ल्याचाही समावेश आहे. कणकवली तालुक्यात नांदगाव व खारेपाटण या गावात किल्ला म्हणून नोंद आहे. नांदगाव कोटाचा माळ म्हणून सुपरिचित असलेल्या ठिकाणी ही नोंद असल्याचे दिसून आली आहे. या किल्ल्याची माती मालवण किल्ला येथे बुधवारी नेण्यात आली.
जिल्हा परिषदेकडून या ३८ किल्ल्यातील माती गोळा करून ती एकत्रित मालवण किल्ला येथे दिनांक १ नोव्हेंबर रोजी नेण्यात येणार आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायतीकडून पूर्वतयारी करून पुरोहित यांच्या हस्ते विधिवत पूजा करून माती गोळा करण्यात आली.
माती गोळा करतेवेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, पुरोहित शरद गगनग्रास, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोटाचा माळ येथे घोडे बांधण्याची जागा
नांदगाव ग्रामपंचायतनजिक कोटाचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. शासनदरबारी त्याची नांदगाव किल्ला अशी नोंद आहे. त्याचा पूर्वेतिहास पाहता जुने जाणते जाणकार लोक तिथे पागेचा माळ नावानेसुद्धा एक ठिकाण आहे, असे सांगतात आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोडे बांधायची जागा होती. ते घोडे राजापूर या ठिकाणाहून येत असत आणि या कोटाचा माळ या ठिकाणी थांबत असत. त्यानंतर ते सावंतवाडीला जात असत, अशी जाणकारांकडून माहिती मिळाली.