कोकणातील मतदारांमुळे नरकासुराचा पराभव
By admin | Published: May 26, 2014 12:50 AM2014-05-26T00:50:15+5:302014-05-26T01:15:43+5:30
उद्धव ठाकरे : सात खासदारांसह घेतले आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन
मालवण : ज्यावेळेला राक्षस माजले होते, त्या त्या वेळेला आई जगदंबेने अवतार घेतला. तोच अवतार यावेळेला आई भराडी मातेने कोकणातील मतदारांच्या रूपाने घेतला. यामुळे कोकणातील नरकासुराचा राजकीय पराभव होऊ शकला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी कोकणी जनतेचेही आभार मानले. कोकण हे शिवसेनेचे आहे. यापूर्वी होते आणि असणार. कोकणातील गुंडागर्दीचे पर्व आता संपले असल्याचेही ते म्हणाले. विनायक राऊत यांना लोकसभेत यश मिळाल्यानंतर त्यांना वाजत-गाजत भराडी मातेच्या दर्शनाला घेऊन येणार, असे कणकवली येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज, रविवारी सहकुटुंब आंगणेवाडीत भराडी मातेच्या दर्शनाला आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राजन विचारे, राहुल शेवाळे, कामगार नेते गुरुनाथ खोत, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी आमदार सदा सरवणकर, शिवानी परब, नाना आंबोले, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुरेश पाटील, अरविंद भोसले, नगरसेवक रविकिरण आपटे, सेजल परब, शैलेश परब, स्नेहा तेंडुलकर, नरेश आंगणे, भाई गोवेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)