अस्थिर राजकारणातही नारायण राणेच केंद्रबिंदू
By admin | Published: March 25, 2017 11:47 PM2017-03-25T23:47:07+5:302017-03-25T23:47:07+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सन २0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात आलेली भाजपची लाट पुढील दोन वर्षांनंतरही कायम आहे. राज्यातील नगरपालिका निवडणूक असो किंवा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका असो सर्वत्र भाजपने बाजी मारली आहे. देशातही पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपची वाढ अगदी जोमाने सुरू आहे. राज्यात भाजप सेनेच्या पाठिंब्यावर सत्तेत असले तरी आणि सत्तेमध्ये शिवसेना वाटेकरी असली तरी या ना त्या कारणाने सत्ताधारी भाजप आणि सेनेमध्येच प्रत्येकवेळी कलगीतुरा रंगत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर बनले आहे. या अस्थिर वातावरणात विरोधी पक्षात असूनही केंद्रबिंदू म्हणून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र नारायण राणे यांचेच नाव आघाडीवर आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का?, भाजप-शिवसेना वेगळे लढणार की अन्य कोणते नवीन समीकरण उदयास येणार या चर्चेइतकेच नारायण राणे आता कोणता निर्णय घेणार ? याकडे संपूर्ण राज्यासह सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील नगरसेवकांची दरी अगदीच काठावर आहे. त्यामुळे आगामी २0१९ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सबका साथ, सबका विकास हा नारा बदलून शत-प्रतिशत भाजप म्हणत सेनेला बाजूला टाकून एकतर्फी मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असला तरी त्यादृष्टीने पावले उचलण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभेत गोंधळ घातलेल्या १९ आमदारांचे निलंबन असो किंवा शेतकरी कर्जमाफी असो शिवसेनेने सत्ताधारी भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे.
भाजप विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येण्याची धडपड एकीकडे सुरू असताना भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही आमदारांना फोडून वेगळी मोट बांधण्याची रणनीतीही आखली जात आहे. या राजकीय घमासानाचा केंद्रबिंदू म्हणून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे पाहिले जात आहे.
नारायण राणेंनी काँग्रेसच्या राज्यातील कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली असून, राणेंचे सुपुत्र आणि रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नारायण राणे हे काँग्रेस सोडण्याच्या मन:स्थितीत असून, त्या अनुषंगाने अनेक घटनांनी दिवसेंदिवस वेग घेतला आहे.
नारायण राणेंसारखा एक मातब्बर नेता आपल्याच पक्षात यावा म्हणून आता भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. सन २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शासनामध्ये महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. मात्र, सन २0१४ च्या निवडणुकांमध्ये राज्यातील परिस्थितीच पालटली. नारायण राणेंसारख्या मोठ्या नेत्याचा कुडाळ-मालवण मतदारसंघात पराभवदेखील झाला. त्यानंतर काँग्रेसने नारायण राणेंना विधान परिषदेवर घेऊन आमदार बनविले असले तरी काँग्रेसमध्ये गेल्या १२ वर्षांत नारायण राणे यांना अपेक्षित न्याय मिळालेला नाही, असे त्यांची कायमच टीका टिप्पणी राहिली आहे.
सध्यस्थितीत नारायण राणेंसारखा जनाधार लाभलेला आणि महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक भागाची माहिती असणारा स्पष्ट वक्ता आणि अभ्यासू शिलेदार काँग्रेसमध्ये नाही. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये राणेंचेच नेतृत्व सर्वात मोठे मानले जाते. प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रव्यापी काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याची टांगती तलवार असल्याने आजच्या खेपेला नारायण राणेच काँग्रेसमध्ये नंबर वन चे नेते आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा देत नाही. त्यामुळे नारायण राणे नाराज आहेत. त्यातून काँग्रेसला गेल्या तीन वर्षात प्रत्येक निवडणुकीत या ना त्या प्रकारे बॅकफुटवर जावे लागत आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसत असतानाही याबाबत चिंतन होऊन राणेंच्या हाती नेतृत्व देण्यास पक्ष मागे-पुढे करताना पहात आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका अथवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपची लाट असतानाही नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला निर्विवाद यश मिळवून दिले आहे. नगरमध्ये विखे पाटील असतील किंवा नांदेडमध्ये अशोक चव्हाण असतील काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत एकतर्फी यश मिळवून देण्यात अपयशी ठरले. मात्र, राणे हे असे नेतृत्व आहे की, सिंधुदुर्गात काँग्रेसने कोणाशी युती न करता एकतर्फी लढा देत जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आणली. राणे यांच्या मागे असलेल्या जनाधारामुळेच त्यांना हे शक्य झाले.
नारायण राणे हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. काँग्रेसमधील फेरबदल करून राज्यात काँग्रेसला पुर्नजिवीत करण्याच्यादृष्टीने पक्षनेतृत्वाने विचार मंथन करणे जरूरीचे असताना पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित फेरबदल होताना दिसत नाही. याबाबतची नाराजी राणे यांनी वारंवार पत्रकार परिषदांमध्ये तसेच विविध ठिकाणच्या मुलाखतींमधून बोलूनही दाखविली आहे. राज्यात भाजपची असलेली लाट थोपविण्याचे आव्हान सर्वच विरोधी पक्षांसमोर आहे. सद्यपरिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संक्रमण काळ सुरू असून गेल्या दोन वर्षांतील सर्वच निवडणुकांचा विचार करता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्येच रस्सीखेच होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेत जरी शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपच्या नगरसेवकांमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. भाजपची मुंबई शहरातील वाढ पाहता आगामी काळात मुंबई काबीज करण्यासाठी भाजपचे आता एक पाऊल राहिले आहे.
राणे यांनी आपल्या राजकीय वाटचालीतील १२ वर्षे वगळता ३५ वर्षे शिवसेनेमध्ये धडाडीने काम केले आहे. शिवसेना शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता अशी सर्व पदे त्यांना शिवसेनेत मिळाली होती. नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांचा मोठा दबदबा होता. तसा तो काँग्रेसमध्ये असतानाही पुढे कायम राहिला. सुरूवातीला नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत १0 ते १२ आमदार होते. त्यानंतर हळू-हळू ती संख्या घटत गेली आणि आता कालिदास कोळंबकर वगळता बहुतांशी सदस्यांनी माघारी परतणे पसंत केले. सद्यस्थितीत शिवसेनेकडे राज्यव्यापी नेतृत्व असलेल्या चेहऱ्याची उणीव आहे. त्यामुळे भाजपला आगामी काळात शह द्यायचा असेल तर शिवसेना नेतृत्वाला राज्याच्या विविध भागातील प्रस्थापित नेत्यांना एकत्रित करून मोट बांधावी लागेल.
राणे हे जर शिवसेनेत पुन्हा दाखल झाले तर शिवसेनेला राज्यात मराठा समाजाचे व्यापक नेतृत्वही मिळेल. तसेच भाजपसारख्या मोठ्या पक्षाशी दोन हात करणेही शक्य होईल. याशिवाय राज्यातील अनेक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणे शक्य होईल. असा शिवसेनेच्या थिंक टँकचा ऱ्होरा आहे. तर दुसऱ्या बाजूने राणे यांना पुर्नप्रवेश देण्यास पक्षातील काही जुन्या जाणत्या नेतृत्वाचा विरोधदेखील आहे. राणे जर पुन्हा सेनेत आले तर आपले अस्तित्व कमी होईल, असा धोका त्यांना वाटत आहे. तसेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर गेल्या १२ वर्षात राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय जहरी टीका वेळोवेळी केली आहे. तसेच नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातील प्राबल्य शिवसेनेनेच मोडीत काढले आहे. तसेच राणे शिवसेनेत परतल्यावर त्यांचे पुनवर्सन करताना त्यांना निवडणुकीत पराभूत करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याशी ते कसे जुळवून घेणार असे अनेक प्रश्न सर्वांसमोरच आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्व आता नारायण राणे यांच्यासारख्या कोकणातील मोठ्या नेत्याबाबत कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नारायण राणे यांनी गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत प्रत्येकवेळी शिवसेना नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तरीदेखील आता त्यांना पुन्हा सेनेत प्रवेश दिल्यावर काहीजण नाराज होतील, असा धोकाही शिवसेना नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे नारायण राणे यांच्या राजकीय उलथा-पालथीबाबतच्या बातम्या दरदिवशी वर्तमान पत्रे किंवा दूरचित्रवाहिन्यांवर झकळल्या जात आहेत. राज्याच्या राजकारणात कायमच खळबळ माजविणारे ‘डॅशिंग नेतृत्व’ म्हणून राणे यांच्याकडे पाहिले जाते.
राणे जेथे जातील तेथे पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी आणि स्वत: मेहनत घेऊन १00 टक्के यश मिळण्याच्यादृष्टीने कायमच प्रयत्न करत असतात. त्यामुळे जर सेना नेतृत्वाने राणे यांना पुर्नप्रवेश दिला तर ते तेवढ्याच ताकदीने शिवसेनेला राज्यात नंबर वन बनविण्याचाही प्रयत्न करतील, यात तिळमात्र शंका नाही.
मंत्री असताना किंवा विरोधी पक्षनेते असताना राणे यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्याने प्रत्येक भागातील समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे शिवसेना म्हणा किवा भाजप दोघांनाही राणेंची ताकद माहित आहेत.
राणे काँग्रेसमध्येच राहून मोठी जबाबदारी स्वीकारतात की अन्य कोणता मार्ग अवलंबितात याकडे सर्र्वाचे लक्ष लागून राहिले आहे. राणे यांनी काँग्रेस वगळून दुसरा कोणताही पर्याय स्वीकारल्यास त्याचे मोठे परिणाम सिंधुदुर्ग आणि राज्याच्या राजकारणावर होणार एवढे मात्र, निश्चित.
सिंधुदुर्गातील राजकीय विरोधकांमध्ये खळबळ
नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले किंवा शिवसेनेत परतले तरी दोन्ही ठिकाणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होणार आहे.
राणेंच्या या निर्णयामुळे सध्या सिंधुदुर्गातील त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये हलचल माजली आहे.
राणेंना सोडून गेल्या दोन वर्षांत त्यांचे काही समर्थक शिवसेना आणि भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आता काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नारायण राणे काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले तर त्यांच्यासमवेत ९५ टक्के कार्यकर्ते सेनेत दाखल होतील.
नारायण राणे यांनी २00५ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासमवेत ९५ टक्के शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यामुळे नारायण राणे जातील किंवा जो निर्णय घेतील त्या प्रत्येक निर्णयासोबतच येथील कार्यकर्ते ठाम राहतील, असा आतापर्यंतचा अंदाज आहे.
ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये नारायण राणे यांनी काम केले त्या प्रमाणात काँग्रेसमध्ये काम करताना राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कायम घुसमटच झालेली आढळते.
त्यामुळे दादा तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणून सर्वच कार्यकर्ते राणेंच्या पाठीशी राहतील.
राणे यांनी गेल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेत असताना किंवा काँग्रेसमध्ये सिंधुदुर्गात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी घडविले आहेत.
त्याबाबतची जाण त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे दादांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानून वाटेल ते करण्यात हे कार्यकर्ते कायमच धन्यता मानत आले आहेत.
राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मात्र, येथील काही शिवसेना नेत्यांच्या राजकीय जीवनात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राणे यांना काँग्रेसमध्ये पराभूत करण्यासाठी किंवा त्यांचे जिल्ह्यातील राजकीय सामर्थ्य खालसा करण्यासाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या आताच्या पदाधिकाऱ्यांसमोर त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
राणेंना शिवसेनेने पुनर्प्रवेश दिल्यास यातील बहुतांशी पदाधिकारी पक्ष सोडून भाजपची वाट धरतील, असे चित्र आहे.
नारायण राणेंसारख्या नेत्याला पुन्हा सेनेत संधी देताना अनेक राजकीय गणितांचा अभ्यास शिवसेना नेतृत्वाला करावा लागणार आहे.
राजकारणात कधीही कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही.
त्यामुळे नारायण राणेंबाबत जो काही निर्णय होईल तो मान्य करणे स्थानिक शिवसेना नेतृत्वासाठी आव्हान ठरणार आहे.
केवळ नारायण राणेंना विरोध म्हणून काँग्रेसविरोधी जाणारे नेतेही सिंधुदुर्गात सद्य:स्थितीत भरपूर आहेत.
राणे शिवसेनेत आल्यावर अशा सेनेतील नेत्यांची गोची होणार आहे.