पराभवाच्या भीतीनेच राणे निवडणुकीला सामोरे जात नाहीत - डॉ. जयेंद्र परुळेकर
By अनंत खं.जाधव | Published: March 12, 2024 06:10 PM2024-03-12T18:10:26+5:302024-03-12T18:11:59+5:30
सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल
सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल या भीतीने केद्रींय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुक लढण्यासाठी घाबरत आहे. त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. मात्र दुसरीकडे किरण सामंत यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना आयत्यावेळी भाजपच्या चिन्हावरच लढावे लागेल, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परूळेकर यांनी मांडले आहे. ते मंगळवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर ही जोरदार टीका केली.
परूळेकर म्हणाले, मंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांचे काजू १३५ रुपयांत शासनाकडून खरेदी करण्यात येतील, असे सांगून पुन्हा एकदा शेतकरी व बागायतरांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली का? याचे पहिले उत्तर द्यावे. सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखवण्यापेक्षा त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये सुधारावीत. त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे मल्टिपेशालिटी च्या नावावर आता दुसरी ही निवडणूक काढणार का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे त्यांच्यावर पक्षाचा दबाव आहे. मात्र आपला पराभव होईल या भीतीने राणे निवडणूक लढवण्यास तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिंदे गटाचे किरण सामंत यांचे नाव चर्चेला आले आहे.ते प्रचार करत असले तरी भाजप त्याना कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यास भाग पाडेल असा दावा परूळेकर यांनी केला आहे.तसेच आयत्यावेळी माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव पुढे येऊ शकते, असा अंदाज ही परूळेकर यांनी व्यक्त केला आहे.