मतदार संघात ठाण मांडून राणेंचा विरोधकांवर प्रहार, प्रचार सभांचा धुरळा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 11, 2024 07:10 PM2024-04-11T19:10:17+5:302024-04-11T19:11:12+5:30
महायुतीचा उमेदवार जाहीर होईना
सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. १२ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. मात्र, गेल्या काही निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदार संघातील नोटीफिकेशनची तारीख आली तरी अद्याप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीचा अजूनही उमेदवार कोण असणार ? हे जाहीर झालेले नाही. भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.
शिंदेसेना आणि भाजपा दोन्ही बाजूंना शांत करून एकच उमेदवार जाहीर करण्याचे कठीण आव्हान महायुतीच्या नेतेमंडळींसमोर आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदार संघात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपाकडून या मतदार संघात मंत्री राणे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी गेले आठ दिवस मतदार संघात ठाण मांडली असून कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रेलचेल पहायला मिळत आहे.
राणे यांनी महायुतीचे तालुकानिहाय मेळावे घेण्यास सुरूवात केली असून उमेदवार कोणीही असा विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राणे सध्या दिवसभरात तीन ते चार जाहीर सभा, बैठका घेत आहेत. आणि या प्रचारसभांमध्ये आपल्या विरोधकांवर जोरदार प्रहार करीत आहेत.
गेली ३० राज्याच्या राजकारणात सतत चर्चेत राहणारे आणि बेधडक, सडेतोड वक्ते म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खाती सांभाळतानाच तळकोकणातील पहिला मुख्यमंत्री होण्याचा मानदेखील मिळविला आहे. मुख्यमंत्री पदाच्या अल्पावधीच्या कालावधीतही त्यांनी धडाकेबाज काम केले आहे. या कामाची स्तुती राज्यातील अनेक नेत्यांनी वेळोवेळी केली आहे. विधानसभेत मंत्री म्हणूनही आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे निवडणुका लढविण्याचे वेगळे कसब त्यांच्याकडे आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपुर उपयोग करून घेत त्यांनी यावेळेस कोकणातील महायुतीचा पर्यायाने भाजपाच पहिला खासदार निवडून आणण्याचा चंगच बांधला आहे.
जुने सहकारी लागले कामाला
नारायण राणे १९९० साली तत्कालिन मालवण कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडून येत जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर सलग सहा निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यावेळपासून राणे यांच्या समवेत कार्यरत असलेले त्यांचे सहकारी मालवणचे दत्ता सामंत, अशोक सावंत यांच्यासारखे जुने सहकारी जोमाने प्रचार कार्यात उतरले आहेत.
मोदींची छबी, रोजगाराची गॅरंटी
राणेंकडून प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. त्याचबरोबर विद्यमान खासदारांनी कोणतेही काम केले नाही तर आणलेल्या प्रकल्पांना आणि कामांना आडकाठी आणण्याचे काम केल्याचा आरोपही ते करीत आहेत. आगामी काळात महायुती सोबत राहिल्यास आपण रोजगाराची गॅरंटी देत असल्याची ग्वाहीदेखील दिली जात आहे.