Sindhudurg NagarPanchayat Election Result: नारायण राणेंना जोरदार धक्का; देवगड गमावले, दोन नगरपंचायती राखल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:56 AM2022-01-19T11:56:44+5:302022-01-19T11:57:29+5:30
Sindhudurg NagarPanchayat Election Result: सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरुंग लावला असून हा आमदार नितेश राणेंना धक्का मानला जात आहे.
मुंबई : सिंधुदुर्गातील चार नगरपंचातींपैकी दोन नगरपंचाती भाजपाला राखण्यात यश आले आहे. तर दोन नगरपंचायती गमावल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसने दोन नगरपंचातींमध्ये नारायण राणेंच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.
सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरुंग लावला असून हा आमदार नितेश राणेंना धक्का मानला जात आहे. नितेश राणेंच्या अनुपस्थितीचा फायदा इथे झाल्याचे पहायला मिळत आहे. देवगडमध्ये शिवसेनेने आठ जागा पटकावल्या आहेत. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. भाजपाला ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी इथे सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्या च्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला. तत्कालीन आमदार कै. आप्पा गोगटे यांच्या पासून भाजपचा बालेकिल्ला होता.
तर कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांना चांगलाच धक्का मतदारांनी दिला आहे. शिवसेना-भाजप युतीकडे असलेली ही नगरपंचायतीमध्ये आतापर्यंतच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने सात जागा पटकावल्या आहेत. तर एक अपक्ष, दोन शिवसेना, एक राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे.
कुडाळची नगरपंचायत एका मताने गेल्याने राणे समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आमदारकी शिवसेनेकडे असल्याने तसेच जिल्हा बँक निवडणूक चुरशीची झाल्याने जिल्हावासियांसह राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. परंतू या निवडणुकीत भाजपाला एका मताने आणि एका जागेने सत्तेपासून दुर केले आहे. कुडाळमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. १७ जागांच्या या नगरपालिकेत भाजपाला यंदा ८ जागाच जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. यामुळे काँग्रेस या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
वैभववाडी नगरपंचात भाजपाने एकहाती जिंकली आहे. भाजपाला 9, शिवसेना 5, अपक्ष 3 अशा जागा मिळाल्या आहेत. अपक्षांपेकी दोघे हे भाजपाचेच उमेदवार होते. यामुळे हा गड भाजपानेच राखल्याचे मानले जात आहे.