रिकामे असल्यानेच नारायण राणे पुड्या सोडतात, सरकारमधील मंत्र्यांची खोचक टीका
By महेश गलांडे | Published: November 1, 2020 08:01 PM2020-11-01T20:01:26+5:302020-11-01T20:04:10+5:30
आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार ३२ तारखेला पडेल, त्याची भाजपने वाट बघावी. आम्ही आमचे काम करत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत असल्याने भाजपवाले खासगीतही मुख्यमंत्र्याचे कौतुक करतात. त्यामुळे आमच्या सरकारला पाच वर्षे भिती नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता काय काम उरले नसल्याने ते पुड्या सोडण्याचे काम करत आहेत, अशी जोरदार टिका महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केली. ते रविवारी आंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, योगेश नाईक, अशोेक दळवी आदि उपस्थीत होते.
मंत्री सत्तार म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये वाळू माफिया असतील तर त्यांच्या विरोधात कडक धोरण राबवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सांगून त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण कदापी अवैध वाळू उत्खनन चालू देणार नाही, असा इशारा मंत्री सत्तार यांनी दिला. वाळूचे दर निश्चीती लवकरच होणार आहे. याबाबतच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे हे दर शासनस्तरावर ठरवले जाणार आहेत. जांभ्या दगडाच्या उत्खननामुळे सरकारने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याने ते पाडापाडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांना ते यश येणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ज्या भाषेत टिका करत आहेत, ती भाषा निषेधार्थ आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. राणे आता कोणतेही काम उरले नाही. त्यामुळे प्रसिद्धीसाठीच ते पुड्या सोडतात, असा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. तर चौकुळचा प्रश्न अद्याप सुटला नसून लवकरच प्रांताधिकारी व तहसिलदार हे गावात जाउन बैठक घेतील आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील नंतरच त्यावर निर्णय होईल यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचेही मंत्री सत्तारी यांनी सांगितले.
कुडाळ प्रांताधिकारी यांची पुन्हा चौकशी होणार
कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची पुन्हा चौकशी होणार असून, आमदार वैभव नाईक यांनी तक्रार दिल्यानंतर एकदा त्यांची चौकशी झाली असून, त्या चौकशीवर कोणाचा विश्वास नसेल तर पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले.