Narayan Rane: आता राज्यातील सत्ता मिळवणे हेच लक्ष्य, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:38 AM2022-01-01T06:38:22+5:302022-01-01T06:39:19+5:30
Narayan Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही जिंकली आहे. आता आमचे लक्ष्य महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहे. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. तो भाजपचाच असेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केले. तसेच आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा बँकेवर यश मिळविता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. राजन तेली यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असेल तर तो पक्षाच्या वरिष्ठांकडे दिला असेल. त्यामुळे ते त्याबाबत निर्णय घेतील आणि आम्हाला तो मान्य असेल.
माझ्या गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात चार-चार दिवस लागतात हे मी प्रथमच पाहत आहे. कायद्याचा आधार घेऊन आम्ही नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाची प्रक्रिया करीत आहोत.
ज्यांना अक्कल आहे, त्यांच्या ताब्यात बँक
नितेश, नीलेश यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली. सर्व मतदारांचीही मोठी साथ मिळाली, त्यामुळे हा विजय मिळाला. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आलेली आहे.
काही जणांना निश्चितच बरोबर घेऊ
विरोधी पॅनलमधील काही जणांना ते आले तर निश्चितच आमच्या बरोबर घेऊ. काहीजण दूरध्वनीवरून आम्हाला संपर्क साधत आहेत,
असा गौप्यस्फोट मंत्री राणे यांनी यावेळी केला.