Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:21 PM2021-08-29T12:21:41+5:302021-08-29T12:23:31+5:30
Narayan Rane: "शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता"
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आज नारायण राणे यांनी शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये केलेल्या कामाची आठवण शिवसेनेला करुन दिली. ते कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार
"संजय राऊत आज शिवसेनेची वाट लावत आहेत. ते पक्षाला खड्ड्यात नेत आहेत. आज माझ्यावर टीका केल्या जात आहेत. पण याच शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये माझाही वाटा आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही", असं नारायण राणे म्हणाले.
संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल
राणेंना सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा
"शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता. दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला होता आणि नारायण जसा असशील तसा निघून ये असं सांगितलं. मी जिथं जाईन तिथं माझ्या पुढे आणि मागे तुझ्या गाड्या असल्या पाहिजेत अशी जबाबदारी मला दिली होती. बाळासाहेब तेव्हा काही दिवस अज्ञातवासात होते आणि त्यांना मी सुरक्षा देत होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी १५ दिवस अंघोळ वगैरे न करता.. जे मिळेत खाऊन आणि गाडीतच झोपत होतो. रात्रभर मच्छरांचा त्रास सहन करत होतो. पण हे सारं बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केलं होतं", असं नारायण राणे म्हणाले.
शिवसेनेत केलेल्या कामाचा दाखला आणि आठवणी सांगत राणेंनी यावेळी पक्षाच्या आजच्या अस्तित्वात असलेलं त्यांचं योगदान दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
"संजय राऊतांना पक्षात काही स्थान नाही. ना ते संपादक, ना त्यांच्याकडे कोणतं खातं, ना कोणतं पद. त्यांच्या लेखांना आणि विधानांना कुणी फारसं महत्त्व देत नाही. त्यांना फक्त बोलण्यापुरतं शिवसेनेनं जवळ ठेवलं आहे", असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला.
संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोला
तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले.