कोकणचे अलौकिक नेतृत्व नारायण राणे
By admin | Published: April 10, 2016 09:38 PM2016-04-10T21:38:31+5:302016-04-11T00:55:52+5:30
वक्त्यांचे गौरवोद्गार : ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ कार्यक्रम; कोकणी माणसाला नवी ओळख
ओरोस : महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणचा दरारा निर्माण करण्याचे काम नारायण राणे यांनी केले आहे. मुंबईतील मराठी माणसाला साऱ्या देशात ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी ओळख मिळवून दिली, त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी कोकणी माणसाला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. त्यांचे हे कार्य अलौकिक असेच आहे, असे गौरवोद्गार ओरोस येथील कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी काढले.
ओरोस येथील शरद कृषी भवनमध्ये सिंधुरत्न फाउंडेशनच्या वतीने ‘नारायण राणे, माहीत असलेले... माहीत नसलेले...’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी नारायण राणे, नीलम राणे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ बाळासाहेब अनासकर, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, मधुकर भावे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे म्हणाले, आमच्या प्रत्येक श्वासावर नारायण राणे यांचाच अधिकार आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला सर्वकाही मिळाले आहे. कार्यकर्त्यांकडून आम्हाला त्यांच्या गुणांबद्दल वेळोवेळी माहिती समजत असते.
नीलेश राणे म्हणाले, नारायण राणे यांना क्रिकेटची फार आवड आहे. सचिन तेंडुलकर त्यांना खूप आवडतो. तो आऊट झाला की ते लगेच टी.व्ही. बंद करतात. कार्यकर्त्यांनाही हे माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांचा मूड खराब झाला की, कार्यकर्ते कोणी भेटायला येऊ नका असे सांगतात. ‘तू माणसांना जप, राजकारण तुला जपेल’, असा मंत्र त्यांनी मला दिला असल्याचेही ते म्हणाले.
किरण ठाकूर म्हणाले, राणे मुख्यमंत्री असताना बेळगाव सीमाप्रश्नी आम्ही त्यांची भेट घेतली होती, त्यावेळी या कर्नाटकवाल्यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आणि हे नाक दाबण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोडा, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने मंत्रिपद त्यांच्याकडे फार काळ राहिले नाही. त्यामुळे हे काम अपूर्णच राहिले आहे. मधुकर भावे, गणेश जेठे, सीताराम गावडे, नकुल पार्सेकर, डॉ. मंदार रानडे, डॉ. नितीन शेट्ये, सतीश पाटणकर, आर्या मढव यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुसूदन नानीवडेकर यांनी यावेळी कविता सादर केली.
सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे राणे यांची ग्रंथतुला करण्यात आली. हे सर्व गं्रथ सावंतवाडी येथील वाचनालयाला प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)
धाडसी, आक्रमक नेतृत्व
राजकारणात अनेक व्यक्ती पाहिल्या, मात्र नारायण राणे यांच्यासारखे धाडसी व आक्रमक नेतृत्व पाहिले नाही. पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारा नेता तसेच आमदारांवर वचक असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मी सहा-सात वेळा निवडून आलो आहे. तेथील जनतेने यामध्ये खंड पाडलेला नाही. मात्र, कोकणी जनतेने नारायण राणे यांना पुन्हा निवडून न देऊन स्वातंत्र्यात खंड पाडलेला आहे. त्यामुळे विकासाचा वेगही कमी झालेला आहे. यापुढे या सर्वस्पर्शी नेत्याला पुन्हा उभे करण्याचे काम सार्वत्रिक प्रयत्न करून करूया, असे आवाहन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
नारायण राणे हे हळव्या मनाचे असून, ते सर्वांवरच मनापासून प्रेम करतात. विधिमंडळात कधीही अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी कोकणचे नाव देशपातळीवर नेले. सन २०१४ हे मनाला चटका लावणारे वर्ष होते. त्यांच्या निवडणुकीतील पराभवामुळे कोकणचेच नुकसान झालेले आहे, असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.