ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:57 PM2019-09-29T12:57:08+5:302019-09-29T14:47:35+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सिंधुदुर्गः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिला आहे. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यानंतर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत.
मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते.
दोन वर्षांपूर्वी राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाने केंद्रातील एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर राणेंना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. म्हणजे दोन वर्षांपूर्वीपासून राणे भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक होते. मात्र, राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी शिवसेनेने विरोध केल्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश रखडला होता. राणेंना थेट भाजपा प्रवेश न मिळाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना तोपर्यंत स्वतंत्र पक्ष काढण्याची संकल्पना दिली असावी. त्यातून राणेंनी पक्ष स्थापन केला. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण करण्याची संकल्पना ही बहुधा त्यावेळीच ठरली असावी, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात कमालीचे बदल झाले आहेत. त्यापूर्वी 25 ते 30 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरणाऱ्या नारायण राणे यांना कुडाळ-मालवण मतदार संघातून पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवसेनेने 2004नंतर 10 वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात तीनपैकी दोन जागा मिळवून आपला भगवा फडकविला होता. नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत 2005मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील 9 वर्षे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. मात्र, 2014च्या निवडणुकीत केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघ तेवढा काँग्रेसकडे राहिला आणि उर्वरित कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदारसंघ सेनेने पुन्हा मिळविले. त्यामुळे राणेंनी एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी तब्बल 9 वर्षे संघर्ष करावा लागला.