'राणेंना कधीही भाजपात प्रवेश मिळणार नाही', राज्यमंत्र्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:49 PM2019-09-30T22:49:10+5:302019-09-30T22:50:09+5:30
आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिलाय. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार
वेंगुर्ले : आपल्या मुलांच्या भविष्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाण्याच्या तारखा देत आहेत. परंतु, काही झाले तरी त्यांना भाजपात प्रवेश मिळणार नाही असा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते
नारायण राणे हे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत.
आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिलाय. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यानंतर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या प्रवेशाचा दावा खोटा ठरला आहे. तसेच, राणेंना भाजपात कधीही प्रवेश मिळणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटलंय. तर, सिंधुदुर्गमधील जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत हे आज खऱ्या अर्थाने राणे यांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याची टिकाही मंत्री केसरकर त्यांनी केली. दरम्यान, सतिश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाला सोडणार असल्याचे घोषित आहे. त्यावरुन, केसरकर यांनी राणेंना लक्ष्य केलं.
दरम्यान, मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते.