सिंधुदुर्गात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नारायण राणेंची टीका
By admin | Published: March 27, 2017 04:47 PM2017-03-27T16:47:32+5:302017-03-27T16:47:32+5:30
सभा अर्धातास उशिराने झाली सुरु: अधिकाऱ्यांच्या मनमानीपणावर राणे बरसले
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीची सभा ११.३0 वाजता असताना ती अर्धा तास उशिराने का सुरु झाली, असा सवाल करत आमदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीपणावर टीकास्त्र सोडले.
जिल्हा नियोजन समितीची सभा ११.३0 वाजता होणार होती, मात्र ती अर्धा तास उशिराने सुरु झाली. त्यावर आमदार नारायण राणे यांनी सभेचे अध्यक्ष पालकमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करत सारवासारव केली.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना डावलून सिंधु सरस कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. लोकप्रतिनिधीपेक्षा अधिकारी मोठे नाहीत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीपणावर टीकास्त्र सोडत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक प्रकाश गायगवाड, जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी हरीबा थोरात आदी उपस्थित होते.
नेत्यांची सभेकडे पाठ
या बैठकीकरडे खासदार विनायक राउत यांच्यासह कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिल तटकरे, कोकण शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार बाळाराम पाटील हे अनुपस्थित होते. आमदार निरंजन डावखरे आणि आमदार अनिल तटकरे हे तर सलग तीन बैठकांना अनुपस्थित होते. याशिवाय जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गांवकर यांनही दांडी मारल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक घेताच कशाला, अशी चर्चा होती.
नवीन जिल्हा नियोजन समिती सदस्यांची मतदानाने होेणार निवड
नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची मतदान होउन निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीच्यावेळी सभागृह सुनेसुने होते. फक्त स्वीकृत सदस्यांनीच किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद सदस्यांची निवड झाल्यानंतर पुढील नियोजन समितीच्या बैठकीत नवीन सदस्य दिसतील.
प्रमोद जठार-नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रमोद जठार आणि आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. इतिवृत्त वाचनाच्या वेळी या दोघांत चकमक झाली. व्यासपीठावर उभे राहत आमदार नितेश राणे आक्रमक झाले. आम्हालाही बोलू द्या अशी मागणी करत र्तंयह?नु विकासाच्या कामाला पैसा खर्च होत नाही, प्रत्यक्षात दाखविला जातो, असा आरोप केला. देवगड तालुक्यात बोअरवेल देताना पक्षपातीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावर माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. याप्रकरणावर आमदार नारायण राणे यांनीही सभागृहात नाराजी व्यक्त करत घणाघाती आरोप केला. नारायण राणे यांनी मागेल त्याला बोअरवेल दिली पाहिजे अशी मागणी केली.