राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी : सिद्धेश परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:06 PM2019-09-24T16:06:56+5:302019-09-24T16:11:09+5:30
राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी असून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी राणे यांनीच तेली यांना भाजपमध्ये पाठविले.
वेंगुर्ला : राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी असून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी राणे यांनीच तेली यांना भाजपमध्ये पाठविले. त्यानंतर आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे जाहीर करून सर्व कार्यकर्त्यांना राजन तेली यांचे काम करण्याची सूचना ते करीत आहेत. येत्या निवडणुकीत तेली यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केल्यास जनता मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीअगोदर भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पक्षप्रवेशाची जणू चटक लागल्यासारखी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. राणे यांनीही काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताबाबत सर्वच क्षेत्रात उलटसुलट चर्चा होत असताना जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी या वृत्ताला जोडून हा घणाघात केला आहे.
२०१४ मध्ये आरोंदा जेटी मुद्यावर राजन तेलींबाबत तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो असे करून कार्यकर्त्यांना थोपविण्यासाठी राणे खेळी खेळत होते. हे आता जनता समजून चुकली आहे. सिंधुदुर्गातील जनता राणेंच्या तालमीत वाढलेल्या तेलींच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही.
आरोंदा जेटीप्रश्नी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेवेळी तेली कसे बदलले, हे येथील जनतेला पूर्णपणे समजले आहे. त्यामुळे फसवाफसवीचे राजकारण फार काळ चालत नाही व बाहेरच्या उमेदवाराला येथील मतदार स्वीकारत नाहीत हे पुन्हा एकदा ही जनता निवडणुकीत दाखवून देईल, असे परब यांनी म्हटले आहे.