पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:10 AM2021-01-04T11:10:47+5:302021-01-04T11:14:16+5:30

Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

Narayan Surve Award to Kavita Shirke, a poet from Pune | पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

पुणे येथील कवयित्री कविता शिर्के यांना समाज साहित्य संघटनेचा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांनी प्रदान केला. यावेळी मधुकर मातोंडकर , किशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कारसोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे -अजय कांडर

कणकवली : मराठीत खूप चांगली कविता लिहिली जात आहे. परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारू व्यवस्थेपासून दूर राहून लिहित आहेत . त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे . सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो , तोच चांगली कविता लिहू शकतो . त्यामुळे सोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले .

समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

कलमठ आदर्श रेसिडेन्सी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कांडर बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे . बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी कविता समृद्ध केली . हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत . त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना , सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले . समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल .

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत चव्हाण, मनिषा पाटील , किशोर वालावलकर , नीलम यादव , प्रमिता तांबे , मुल्ला , ॲड . मेघना सावंत आदी उपस्थित होत्या .

कविता शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो. पण , आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत . त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक मानसिकतेत व्यर्थ होत जाते . एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहते की , स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा दर्प आहे . इथली माणसे , इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पाडतो.

इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणूसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो . आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो व आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपले भविष्य ठरवत असतात . कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले . तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मियता पाहून मला वाटते हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरी माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरलात .

मातोंडकर म्हणाले , सिंधुदुर्गात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत . अशावेळी अजूनही एक समाज साहित्य संघटना कशाला ? असा प्रश्न सहज पडेल . परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे . या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे .

या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. याचे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे. प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार मनिषा पाटील यांनी मानले .
 

 

Web Title: Narayan Surve Award to Kavita Shirke, a poet from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.