नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:45 PM2023-02-18T13:45:01+5:302023-02-18T13:46:01+5:30
शिवसेनेच्या पाठीत वार केले
कणकवली: सिंधुदुर्गातील दहशतवाद आम्ही यापूर्वीच गाडून टाकलाय. तरीही शिवसैनिकांवर हल्ले झाले तर पुन्हा एकदा कनेडी पॅर्टन दाखविल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना संपविण्याचा कट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रचला आहे. मात्र,शिवसेना संपविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना शिवसैनिक कधीही सोडणार नाहीत.असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी येथे केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गुरुवारी सकाळी लागलेल्या 'इलाका तेरा ,धमाका मेरा' या बॅनर नंतर या दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली होती. कणकवलीत आल्यानंतर संजय राऊत यांनी राणेंसह शिंदे गटावर देखील टीका केली.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, राजू राठोड, सचिन सावंत, जान्हवी सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, शिल्पा खोत, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संजय राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली. अनेक माणसांना त्यांनी सरदार बनवले. परंतु काहींनी शिवसेनेच्या पाठीत वार केले. आता तर शिवसेना संपविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर वार केले आहेत.
कोकणातील माणसांनी, चाकरमान्यांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली. खरे तर शिवसेना या चार नावामुळे आम्ही सर्व नेतेमंडळी नावारूपाला आलो. राणे, शिंदे यांनाही शिवसेनेमुळेच ओळख मिळाली.
केंद्र आणि राज्यातील भाजप आघाडीचं सरकार सुडाचे राजकारण करतंय. मला तुरूंगात टाकले. शिवसेनेत राहिलेल्या आमदारांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत. आमदारांची चौकशी केली जातेय. पण जे सरकार भ्रष्टाचारातून उभे राहिले ते आमच्या आमदारांची काय चौकशी करणार?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील जेवणावळीवर तीन महिन्यात तब्बल ३ कोटी रूपये खर्च झाला आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, वसंतराव नाईक ११ वर्षे मुख्यमंत्री होते. पण जेवणावळीवर तीन कोटींचा खर्च करणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
यावेळी विनायक राऊत, वैभव नाईक , दत्ता दळवी, सतीश सावंत, जान्हवी सावंत,अतुल रावराणे, संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त केले.