खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार, नासीर काझींचा प्रशासनाला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:28 PM2020-08-25T16:28:31+5:302020-08-25T16:30:14+5:30
वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.
वैभववाडी : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. बांधकाम विभागास यापूर्वी सूचना देऊनही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.
१५ जुलैला आमदार नीतेश राणेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यानी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जातील असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात आता गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मात्र, अजूनही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.
तळेरे-गगनबावडा, खारेपाटण-गगनबावडा, उंबर्डे-फोंडा, भुईबावडा-जांभवडे या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे गेल्याच आठवड्यात बांधकाम विभागाशी बांधकाम विभागाशी पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु अद्याप खड्डे बुजविण्यात आलेले नाही.
खड्ड्यांमुळे गणेशभक्तांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी कोणत्याही क्षणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी तहसीलदारांना दिले आहे.