Sindhudurg: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:36 PM2024-05-08T15:36:22+5:302024-05-08T15:36:48+5:30
कणकवली: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदाचा राजीनामा दे नाहीतर जीवेमारीन अशी धमकी देत चिव्याच्या दांड्याने व लोखंडी सळीने मारहाण केल्याप्रकरणी कणकवली ...
कणकवली: नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदाचा राजीनामा दे नाहीतर जीवेमारीन अशी धमकी देत चिव्याच्या दांड्याने व लोखंडी सळीने मारहाण केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात नाटळ येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत (३३, रा. नाटळ खांदारेवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार किशोर विठ्ठल परब, किरण किशोर परब, महेश महादेव खांदारे (तिघेही रा. नाटळ, खांदारेवाडी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
गणेश सावंत यांची एक वर्षांपूर्वी नाटळ तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी किशोर परब हे इच्छुक होते. तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड न झाल्याने त्यांच्या मनात राग निर्माण झाला होता. दोन महिन्यापूर्वी त्यांनी गणेश सावंत यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात धमकी दिली होती. मात्र गणेश सावंत यांनी या संदर्भात कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती.
सोमवारी रात्री गणेश सावंत हे जेवण करून घराबाहेर फिरण्यासाठी गेले असताना किशोर परब, किरण परब, महेश खांदारे यांनी शिवीगाळी करत चिव्याचा दांडा व लोखंडी सळीने गणेश सावंत यांच्यावर हल्ला केला. यात गणेश सावंत यांच्या हनवटीला जखम झाली असून डाव्या हाताला मुका मार लागला आहे. तसेच किरण परब याने १५ दिवसात तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दे नाहीतर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.