नाथ पै पिढी घडविणारी संस्था
By admin | Published: February 8, 2015 12:59 AM2015-02-08T00:59:50+5:302015-02-08T01:00:13+5:30
विनायक राऊत : वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
कुडाळ : बॅ. नाथ पै हे सर्वगुणसंपन्न असे कोकणातीलच नव्हे, तर देशातील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने चालणारी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था अष्टपैलू असून, वैचारिक श्रीमंती असलेल्या या शिक्षण संस्थेतून बहुगुणी व सद्गुणी विद्यार्थ्यांची देशाला घडविणारी पिढी बाहेर पडेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक उद्घाटनप्रसंगी केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, अध्यापक विद्यालय व कला, वाणिज्य, विज्ञान महिला महाविद्यालय यांचा संयुक्तिक वार्षिक स्रेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राध्यापक अल्ताफ खान, बांदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, प्राचार्या डॉ. दीपाली काजरेकर, प्राचार्य सरोज दाभोलकर तसेच इतर प्राध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी बॅ. नाथ पै संस्था संचलित अध्यापक, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विविध कला, क्रीडा, निबंध व वक्तृत्व तसेच इतर स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना खासदार राऊत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकीकडे सामाजिक भान विसरत असताना सामाजिक बांधीलकी जपणारे खासदार राऊतांसारखे नेतृत्व मिळाले असल्याचे संंस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले.
यावेळी प्रा. अल्ताफ खान म्हणाले, शिक्षण हे आपल्यापेक्षा चार पावले पुढे असते. त्यामुळे स्वत: बदलून शिक्षकांनी मुलांना हाताळण्याचे तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. हे जग टेक्नॉलॉजीचे असून, ज्ञान मिळवीत रहा. पालक व मुले यातील दरी वाढू न देता पालकांनी मुलांशी संवाद साधावा. शाळेत शिक्षकांनी मुलांशी पालकांप्रमाणे, तर पालकांनी शिक्षकांप्रमाणे वागावे, तरच आजच्या पिढीशी आपण अधिक व्यापक प्रमाणात संवाद साधू शकू, असेही ते म्हणाले.
स्वत:ला दररोज अपडेट करण्यासाठी दैनंदिन अलर्ट रहा. सरावाने हे ते तुमच्या अंगवळणी पडेल, असे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)