नाथपंथीय साधूंची मसूरकरांकडून सेवा
By admin | Published: November 19, 2015 09:39 PM2015-11-19T21:39:45+5:302015-11-20T00:09:07+5:30
साधुसंत येती घरा : गावातून सवाद्य मिरवणूक; चौकाचौकांत उत्साहात स्वागत
मसूर : नाशिकहून सिंहस्थ कुंभमेळा आटोपून बेंगलोरकडे परतणाऱ्या नवनाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे मसूरमध्ये आगमन झाले. त्यांचे येथील जुन्या बसस्थानक चौकात कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, जय महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे सतीश पाटील, माजी सरपंच प्रकाश माळी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या झुंडीमध्ये पावणेपाचशे साधूंचा समावेश होता. एक दिवसाचा मुक्काम करून सर्व साधंूनी गुरुवारी कऱ्हाडकडे प्रस्थान केले. नाशिकचा कुंभमेळा झाल्यानंतर १९ आॅगस्टला या साधूंच्या झुंडीने बेंगलोरकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. ७ मार्च २०१६ रोजी त्यांच्या पदयात्रेची सांगता होणार आहे.
साधूंच्या झुंडींचे आगमन या ठिकाणी झाल्यानंतर त्यांना जुन्या बसस्थानक चौकापासून खडकपेठ, चावडी चौक, पाटीलवाडा मार्गे बाजारपेठेत सवाद्य मिरवणुकीने आणण्यात आले.
बाजारपेठेतील कठ्ठे तसेच कोठावरील प्राथमिक शाळा व इंदिरा कन्या प्रशालेत या साधूंची राहण्याची व्यवस्था केली होती. बाजारपेठेतील व्यासपीठावर प्रतिष्ठापना केलेल्या योगी निर्मलनाथजी, महंत योगी सुमनाथजी यांच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली
होती.
व्यवस्थापन समितीतील गोविंद जगदाळे, बापूसाहेब जगदाळे, महेश जगदाळे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, नरेश माने, सुनील दळवी, प्रकाश जाधव, नाथाजी पाटील, लहुराज जाधव आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)