राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:44 PM2019-03-07T13:44:12+5:302019-03-07T13:46:27+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीची मासिक सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश पाटील, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती अंकुश जाधव, अनिषा दळवी, जेरॉन फर्नांडिस, सदस्य श्वेता कोरगावकर, सरोज परब, उत्तम पांढरे, प्रमोद कामत, मायकल डिसोजा, अधिकारी तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होता. यात २८ योजना व ३१ वाड्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी अद्यापपर्यंत १० योजना व १० वाड्यांचे पेयजलचे काम पूर्ण झाले असून यावर ५ कोटी १७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तर अद्यापही १८ योजना व २१ वाड्यांची कामे होणे बाकी आहे.
यासाठी १० कोटी रुपये निधी शिल्लक आहे. पेयजलची कामे करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी दिली.
यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा ४ गावे व ५१३ वाड्यांचा बनविण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून ४६९ पपत्र अ प्राप्त झाली आहेत. पपत्र ब साठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १३८ अंदाजपत्रके जिल्ह्याला प्राप्त झाली असून विविध टंचाईच्या कामांची ३४ पपत्रे अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. या अंदाजपत्रकांना मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अंतर्गत जिल्ह्यात अद्यापही २४४२ जणांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर येत आहे. जानेवारीपासून ६६९६ जणांकडे शौचालय नव्हते. मात्र, त्यानंतर ४२५४ जणांनी शौचालय बांधून पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबनिहाय शौचालय असणे आवश्यक आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळमध्ये सर्वाधिक दूषित विहिरी
आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १० टक्केपेक्षा जास्त दूषित पाणीनमुने आढळून आले आहेत. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये पाणी नमुने समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दूषित पाणी नमुने शुद्ध करून ते पिण्यायोग्य करण्यात आले आहेत.
... थकीत ५ कोटी प्राप्त
गतवर्षी पाणीटंचाईअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची बिले निधीअभावी रखडली होती. त्यामुळे ठेकेदारांमधून नाराजीचा सूर होता. जिल्हा परिषदेच्यावतीने यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर दोन टप्प्यात हे पैसे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २ कोटी ९४ लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी रुपये असे एकूण ४ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित ठेकेदारांचे पैसे देण्याचे काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी सांगितले.