राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

By admin | Published: January 9, 2017 11:02 PM2017-01-09T23:02:46+5:302017-01-09T23:02:46+5:30

अतुल रावराणेंसह कार्यकर्ते भाजपमध्ये : काँग्रेस, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचीही सोडचिठ्ठी

Nationalist Congress push | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

Next

वैभववाडी : युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजप प्रवेशकर्त्यांमध्ये राणे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोभा पांचाळ, लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष दीपक सांडव, देवगडचे माजी सभापती अमित साळगावकर यांच्यासह काही आजी-माजी तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. या भाजप प्रवेशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून जिल्ह्यात काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर अतुल रावराणे व दीपक सांडव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
अतुल रावराणे हे अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून पाच वर्षांपूर्वी पक्षाने त्यांना सिंधुदुर्गात सक्रीय केले होते. संदेश पारकर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर रावराणे यांनीच कणकवली मतदारसंघासह जिल्ह्याच्या अन्य काही भागात राष्ट्रवादीला संजिवनी देण्याचे काम केले होते. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना कणकवली मतदारसंघातून रिंगणात उतरविले होते.
निवडणुकीनंतरही अतुल रावराणे यांनी मतदारसंघातील कणकवली, वैभववाडी देवगड तालुक्यात पक्षीय कार्यक्रमांसह विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमातून पक्ष संघटनेवर भर दिला होता. मात्र, राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकारण आणि वरिष्ठ नेतृत्वाचे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे रावराणे नाराज होते. त्यातच बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्ह्याच्या राजकारणात सहभाग वाढल्यानंतर मंत्री चव्हाण व रावराणे त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. रावराणेंसोबत राष्ट्रवादीच्या संपूर्ण वैभववाडी तालुका कार्यकारिणीने भाजपमध्ये प्रवेश केला. देवगडचे माजी सभापती अमित साळगावकर यांनीही ‘कमळ’ हातात घेतले
आहे. (प्र्रतिनिधी)
अतुल रावराणे : कामांसाठी भाजपचा मार्ग पत्करला, निवडणुकीत यश मिळवून देणार
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जबाबदारी सोपविल्यापासून आपण पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीकडे नेतृत्वाचे सतत दुर्लक्ष झाले. शिवाय जनतेला अपेक्षित विकास कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे.
त्यामुळे जनतेच्या हितासाठी आपण आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. यापुढे पक्ष नेतृत्व देईल ती जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पार पाडून आगामी निवडणुकांमध्ये विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्याचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे मतही अतुल रावराणे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश रावराणे, उपाध्यक्ष सुनील नारकर, सरचिटणीस प्रकाश वळंजू, खजिनदार धुळाजी काळे, संतोष बोडके यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. मिठमुंबरी सरपंच बाळा गावकर, मठबुद्रुक सरपंच जिजबा पाटील, राजू तावडे, प्रकाश गुरव, भाई घाडीगावकर, सुरेश पुजारे, गजेंद्र कांबळी आदी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या २00 जणांचा समावेश होता.
मालवणमधील दीपक सांडव हे राणेंचे कट्टर समर्थक व माजी खासदार नीलेश राणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु, सांडव यांची गेले वर्षभर अतुल रावराणेंसोबत उठबस दिसून येत होती. शोभा पांचाळ यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे.

Web Title: Nationalist Congress push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.