श्रमदानातून नैसर्गिक झऱ्यांची दुरुस्ती
By admin | Published: December 9, 2014 09:51 PM2014-12-09T21:51:15+5:302014-12-09T23:18:28+5:30
ओटवणे ग्रामस्थांचा उपक्रम : भटवाडी-शेरवाळेवाडी दरम्यानचा रस्ता
ओटवणे : येथील भटवाडी ते शेरवाळेवाडी या दरम्यान तब्बल दीड किलोमीटर वाहत जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक झऱ्याची स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून दुरुस्ती केली.
या झऱ्याचे पाणी प्रवाहीत होण्यासाठी मातीचे पाट तयार करून त्यांची डागडुजी करण्याचे काम ग्रामस्थांमार्फत दरवर्षी श्रमदानातून केले जाते. ओटवणे-भटवाडी येथे जवळ-जवळ पाच अश्वशक्तीहून अधिक क्षमता असलेला पाण्याचा प्रवाह झऱ्यामार्फत निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हा प्रवाह मातीच्या पाटामार्फत आपल्या शेतीकडे वळविला आहे. यासाठी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत लांबीचे पाट ग्रामस्थांनी तयार केले आहेत. परंतु हे पाट पावसाळ्यात कोसळत असल्याने दरवर्षी पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करावी लागते. तसेच पाटातून पुढे वाहत जाणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीसाठी शेततळी नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते.
याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून या झऱ्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पक्क्या सिमेंटचे बंधारे, पाणी साठवणुकीच्या शेततळी यासाठी निधी मंजूर व्हावा, यासाठी शासनाकडे निवेदने, प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र, शासनाकडून त्यासंबंधी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. स्थानिक ग्रामपंचायतही उदासीन आहे.
या पाण्याचा वापर करून गावठणवाडी, भटवाडी, शेरवाळेवाडी येथील १५० कुटुंबे उन्हाळी शेती करतात. या पाण्यामुळे सुमारे पाच एकरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. दीड किलोमीटर लांब असलेल्या या झऱ्याच्या पाटाची स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून दुरुस्ती केली.
यावेळी सुनील गावकर, नारायण गावकर, न्हानू गावकर, प्रकाश गावकर, बाबाजी गावकर, अनंत धुरी, अर्जुन भिसे, दशरथ गावकर, प्रकाश गावकर, मिलिंद भिसे, विजय गावकर, गोविंद भिसे, राजू मेस्त्री, मुकुंद गावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शासनाकडे वेळ नाही
की पैसा
एका बाजूला एकात्मिक पाणलोट विकास तसेच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली शासनाकडून पाणी साठवणुकीसाठी गवगवा केला जातो, कोट्यवधी रुपये खर्ची घातले जातात, परंतु या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही त्याचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे वेळ नाही की पैसा, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे.