नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन हवे
By admin | Published: February 12, 2016 10:34 PM2016-02-12T22:34:18+5:302016-02-12T23:43:26+5:30
दीपक केसरकर : कोकण कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रविषयक परिसंवाद
दापोली : भारत कृषिप्रधान देश असून, बहुतांश जनता शेतीवर अवलंबून असली तरी देशाच्या अर्थकारणामध्ये शेतीचे योगदान अतिशय कमी आहे, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही, देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर त्यासाठी शेतीचा विकास होणे अत्यावश्यक आहे. हा विकास साधण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि नियोजन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नाही. ही मानसिकता बदलून प्रगत शेतीशिवाय तरणोपाय नाही. ही भावना प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवली पाहिजे, असे प्रतिपादन वित्त आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रविषयक परिसंवादाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, अन्य राज्यांमध्ये काही पिकांची उत्पादकता आपल्या राज्यापेक्षा जास्त दिसून येते. याची कारणमिमांसा अभ्यासून तशा पद्धतींचा राज्यामध्ये अवलंब होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याद्वारे पिकाची उत्पादकता वाढून शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर भारत सरकारच्या भटक्या व विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे आणि कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जीवन तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. तपस भट्टाचार्य म्हणाले, शेतीतील उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये खूप तफावत आहे. यासाठी विपणनानंतर उत्पादक शेतकऱ्याला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण वाढवले गेले पाहिजे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य करणे शक्य आहे. याचबरोबर विविध पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर देणेही अत्यावश्यक आहे. शेती करताना निव्वळ एकाच पिकावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला आंतरपिके आणि विविध पूरक व्यवसाय यांचा अवलंब केल्यास शेतीचा आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास होण्यास निश्चित हातभार लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
परिषदेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिका आणि सिडीजचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी विद्यार्थ्यांच्या योगदानातून प्राप्त झालेल्या रकमेचा धनादेशही केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजक सचिव डॉ. सुधीर वाडकर यांनी केले. डॉ. नितीन गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जीवन तलाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दादा इदाते : थेंब न थेंब साठविणे गरजेचे
कोकणातील पाण्याचा थेंब न थेंब कसा साठविता येईल आणि प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिके कशी घेता येतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रमुख अतिथी दादा इदाते यांनी यावेळी सांगितले.
३१० शास्त्रज्ञ
या परिषदेमध्येएकूण २९९ संशोधनपर लेख सादर करण्यात येणार असून, या परिषदेमध्ये देश-विदेशातील ३१० शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला आहे.