नैसर्गिक सुबत्ता; तरीही झोळी रिकामीच

By admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:13+5:302016-08-18T23:34:21+5:30

नगर परिषदेचे दुर्लक्ष : येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी या प्रश्नांवर विचार होणार?--निवडणुकीचे नगारे - १

Natural subdivision; Still empty the beans | नैसर्गिक सुबत्ता; तरीही झोळी रिकामीच

नैसर्गिक सुबत्ता; तरीही झोळी रिकामीच

Next

मनोज मुळ्ये -- रत्नागिरी --देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी..., या ओळी रत्नागिरी शहराला आणि नगर परिषदेच्या आजवरच्या राज्यकर्त्यांना लागू होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासारख्या असंख्य गोष्टी निसर्गाने रत्नागिरीला दिल्या आहेत. पण, त्याचे सोने करण्यात आजवर आपल्याला कधीच यश आलेले नाही. दोन उत्कृष्ट समुद्रकिनारे, एक किल्ला, एक ब्रिटिशकालीन राजवाडा, असंख्य बगीचे असे बरेच काही सौंदर्य रत्नागिरीच्या खजिन्यात असले तरी त्याचे जतन आणि सुधारणांच्या नावाने शिमगाच आहे. सतत रस्ते आणि स्ट्रीटलाईट उभारणाऱ्या नगर परिषदेच्या विषय पत्रिकेवर ‘सुंदर रत्नागिरी’ हे शीर्षक कधी झळकणार, हा प्रश्नच आहे.
प्रत्येक शहराला, प्रत्येक गावाला निसर्गत:च काही वैशिष्ट्ये आहेत. ज्या शहरांनी ही वैशिष्ट्ये ओळखून त्याला पूरक विकासाच्या गोष्टी केल्या, तिथला रोजगाराचा प्रश्न आपोआपच मार्गी लागला. गोव्यासारख्या राज्याचे उदाहरण अगदी जवळचे आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन प्रार्थनास्थळे ही गोव्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये. या दोनच वैशिष्ट्यांवर गोवा पर्यटनात जगाच्या नकाशावर झळकत आहे.
रत्नागिरीत गोव्यासारखे सर्व काही आहे. समुद्रकिनारा, तीन बाजूंना पाणी आहे असा किल्ला, किल्ल्यावर प्राचीन मंदिर, ब्रिटिशांनी कजरकैदेत ठेवलेल्या थिबा राजाचा राजवाडा आहे. श्री देव भैरव मंदिर, राम मंदिर, दक्षिणाभिमुख मारूती अशी चांगली मंदिरे आहेत. पण रत्नागिरीची ही ठिकाणे पर्यटकांसाठी म्हणून विकसित झालेली नाहीत. निसर्गाने जे दिलेले आहे, ते अजिबात न सुधारता तसेच घेऊन वर्षानुवर्षे रत्नागिरी पुढे सरकत आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा विचार राजकीय पक्षांनी करावी, ही नागरिकांची अपेक्षा रास्त आहे.


रस्त्यावरून रस्त्यावरचे राजकारण
1रत्नागिरीतील रस्त्यांची कामे दुसऱ्या पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्याचे नातेवाईक करतात म्हणून ती बराच काळ अडवून ठेवण्यात आली आहेत. या राजकारणात रत्नागिरीतील अनेक रस्ते खराबच राहिले आहेत. गेली काही वर्षे या राजकारणाने अतिरेक गाठला आहे आणि त्यात त्रास सहन करावा लागत आहे तो नागरिकांना. या साऱ्यालाही लोक आता कंटाळले आहेत. मुख्य रस्ता वगळला तर रत्नागिरीतील कुठलाही जोडरस्ता चांगल्या दर्जाचा नाही आणि त्याची दुरूस्तीही होत नाही.

भगवती किल्ला आणि पुरातन मंदिर
2ज्याच्या तीनही बाजूंना समुद्र दिसतो, अशा रत्नदुर्ग तथा भगवती किल्ल्याकडेही आजवर दुर्लक्षच झाले आहे. किल्ल्याकडे जाणारा रस्ता चांगला नाही. किल्ल्यावर सोयींची वानवा आहे. किल्ल्याच्या शेजारीच असलेल्या अवाढव्य उद्यानाची अवस्था खराब झाली आहे. किल्ल्याच्या एका टोकाला भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे. पण, त्याकडेही नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे. पर्यटनस्थळ म्हणून उत्कृष्ट ठरू शकणाऱ्या या ठिकाणाकडे नगरपरिषदेने गांभीर्याने पाहिलेलेच नाही. त्यामुळे रत्नागिरीचे हे वैभव मातीमोल ठरत आहे.

उद्यानांची स्मशानभूमीच करणार?
3रत्नागिरी शहरात ३६ लहान मोठी उद्याने आहेत. या उद्यानांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष आहे. देखभाल नाही, खेळण्यांची दुरूस्ती नाही, अशामुळे ही उद्याने भविष्यात स्मशानभूमी बनण्याची भीती आहे. नगर परिषदेचे सफाई कामगार आपल्या खासगी बागेत पाठवणारे लोक त्यांच्याकडून उद्यानांची साफसफाई करून घेत नाहीत. अगदी मोजक्या चार बागा वगळल्या तर उर्वरित उद्यानांकडे कोणाचेही लक्ष नाही. नगर परिषदेची उद्यानांसाठीची काही आरक्षणे तशीच पडून आहेत. आरक्षित जागा विकसित न करण्यात काही लोकांना विशेष स्वारस्य आहे आणि सगळ्याच पक्षांच्या या दुर्लक्षाला नागरिक कंटाळले आहेत. गेल्या दोन वर्षात उभ्या राहिलेल्या संसारे उद्यानसारखी इतर उद्यानांनाही झळाळी देता आली असती. उद्यानांचे शहर म्हणूनही रत्नागिरीला ओळख देता आली असती इतके चांगले ‘स्पॉट’ नगर परिषदेकडे आहेत. पण ते विकसित करण्यापेक्षा विकासकाला देण्यातच अनेकांना स्वारस्य आहे. त्यामुळे अनेक उद्याने म्हणजे खुली मद्यालये होत आहेत.

जाब द्यावाच हवा
4डिसेंबर महिन्यात नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांना या प्रश्नांचा जाब द्यावाच लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी हा जिल्ह्याचा केंद्रबिंदू करण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत, त्यातून इथल्या तरूणांना रोजगार मिळेल असा विचार का झाला नाही आणि यापुढे तरी ते करणार की नाही, असा प्रश्न आता लोकांनीच विचारायला हवा.


समुद्रकिनाऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्षच!
शहरातच मांडवी समुद्रकिनारा उत्कृष्ट आहे. भाट्ये येथील सुरूबन आणि तिथला समुद्रकिनारा हा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असला तरी तो आता रत्नागिरीचाच एक भाग झाला आहे. काळी वाळू असलेल्या मांडवीची ‘ब्लॅक सी’ अशी आणि पांढरी वाळू असल्यामुळे मिऱ्या (पंधरामाड) येथील समुद्रकिनाऱ्याची ‘व्हॉईट सी’ अशी ओळख आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या समुद्रकिनाऱ्यांकडे नगर परिषदेने पुरेसे लक्ष दिलेले नाही. स्वच्छ किनारपट्टी, बसण्याची चांगली व्यवस्था आणि तेथील स्थानिकांच्या स्टॉल्सची योग्य रचना याकडे दुर्लक्ष झाले आहे. मांडवी किनाऱ्यावरील जेटीची अवस्था अत्यंत खराब आहे. पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित आहे. रत्नागिरीत राहण्यासाठी आलेले कितीसे पर्यटक या किनाऱ्यांकडे फिरकतात, हा प्रश्नच आहे.
मांडवीचा समुद्रकिनारा खडकाळ आहे. तो पोहण्यास योग्य नाही. मात्र, या खडकाळ भागाचा उपयोग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कसा करता येऊ शकेल, याचा विचारच झालेला नाही. रत्नागिरीला लागूनच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये अशा खडकाळ किनाऱ्यावर ‘रॉक गार्डन’ विकसित करण्यात आले आहे. तसा प्रयत्न रत्नागिरीत कधी झालेला नाही.
सुटीच्या दिवसांमध्ये येथे काही नियमित कार्यक्रमांचे आयोजनही करता येऊ शकते. येथे नगराध्यक्ष चषक सांस्कृतिक स्पर्धेपेक्षा क्रिकेट स्पर्धाच जास्त काळ झाल्या, हे काहीसे दुर्दैवच.

Web Title: Natural subdivision; Still empty the beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.