निसर्ग साक्षरता चळवळीची गरज
By admin | Published: January 19, 2016 12:03 AM2016-01-19T00:03:23+5:302016-01-19T00:06:03+5:30
राजेंद्रसिंह : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
रत्नागिरी : कोकणातील निसर्ग सुखी व समृध्द होण्यासाठी निसर्ग साक्षरतेची चळवळ उभी करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या युवापिढीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रॅमन मॅगासेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृह येथे आयोजित जलचेतना मार्गदर्शन मेळाव्यात डॉ. राजेंद्रसिंह हे बोलत होते. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, स्वामी जयमृत्युंजय, जयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.
२१ व्या शतकामध्ये जल, वायू परिवर्तन सुरू आहे. कोकण तर भारताचा स्वर्ग आहे. येथील लोक, सुंदर पर्वत, हिरवेगार जंगल, डोंगरावरील सुंदर घरे यामुळे कोकण हे नंदनवन आहे. ४ मीटर पाऊस याठिकाणी पडतो, तरीही पाण्याबाबत दुर्भिक्ष आढळते. गेल्या दोनशे वर्षाचा इतिहास पाहिला तर धरणीमातेच्या वरच्या भागाबाबत संशोधन झाले. मात्र, धरती हिरवीगार राहण्यासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे जर ठोस उपाययोजना झाली नाही तर या भविष्यात स्वर्गाचे नरकात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.
नद्या गाळांनी भरल्या आहेत. शिवाय शहरातील मैला नदी, नाल्यांतून सोडण्यात आल्याने प्रदूषित झाल्या आहेत. विहिरींची पातळी खालावली आहे. राजस्थानमध्ये गेली ३१ वर्षे अव्याहतपणे काम केल्यामुळेच तेथे नद्या वाहू लागल्या आहेत, विहीरीतील पाण्याची पातळी वाढली आहे. भविष्यात याच प्रयत्नामुळे राजस्थानदेखील सह्याद्री बनेल, असेही डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले. त्यासाठी राजकीय नेते मडळींनीही सहकार्य केले पाहिजे, असे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. कोकण भूमि प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव यांनी कोकणातील प्रत्येक महाविद्यालयाने एक नदी दत्तक घेतली पाहिजे, असे सांगितले. जलसाक्षरतेसाठी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे किशोर धारिया यांनी सांगितले. सोसायटी कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी १५० इंच पाऊस पडूनही कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, हे टाळण्यासाठी चळवळ उभारण्याची आवश्यकता स्पष्ट केली. प्रा. महेश नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राजस्थानात ३१ वर्ष : महाविद्यालयाचे कौतुक
राजस्थानमध्ये ३१ वर्षापासून अव्याहतपणे काम केल्यामुळेच आता त्याठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या खळखळून वाहू लागल्या आहेत, हिरवीगार शेती शिवारात डोलू लागली आहे. ढग बरसू लागले आहेत. मात्र, माझ्यासह हजारो मंडळींनी त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. स्लाईड शोद्वारे त्यांनी १५ वषापूर्वीचा राजस्थान व आजचा राजस्थान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. महाविद्यालयाच्या गेले १६ वर्षे गोळप येथे सुरू असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
जलचेतना मार्गदर्शन
जयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत यांच्या ‘कोकणातील बेदखल कुळांचे प्रश्न’ विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.