नौदल दिन: चित्तथरारक कसरतींनी भारतीय नौदलाने जिंकली मने, मिसाइलद्वारे हल्ला ठरले आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:12 PM2023-11-30T12:12:19+5:302023-11-30T12:12:48+5:30
समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव
संदीप बोडवे
मालवण: भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडी चा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा आजचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
सराव प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला मरीन कमांडोनी विमानातून खाली उडी मारत पॅराशुट द्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखवले. या नंतर समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तसेच सैनिकांना वाचविण्यासाठी धनुष हेलिकॉप्टरचे आगमन झाले. या हेलिकॉप्टर मधून मदतीची वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि सैनिकांना हवेतल्या हवेत एअरलिफ्ट करण्यात आले. आणि त्यांना सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले. त्यानंतर समुद्रात घात लावून पाण्यात लपून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडी चा शोध घेण्यासाठी ए एस डब्ल्यू हेलिकॉप्टरने सोनार बॉडीला समुद्राच्या पाण्यात सोडत दुष्मनाची पाणबुडी सोधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
मोठ्या धमाक्यासह शत्रूची चौकी उध्वस्त..
- आजही नौदलाच्या आयएनएस कोलकाता, तलवार, ब्रह्मपुत्रा, सुभद्रा, यांसह आयएनएस बेतवा आदी युद्ध पोतांनी तारकर्लीच्या समुद्रात संचलन केले. यावेळी आयएनएस बेतवा वर सी किंग हेलिकॉप्टर यशस्वीपणे उतरविण्याचा यशस्वी डेमो करून दाखवण्यात आला. आजच्या दिवसाचे आयएनएस खंडेरी आकर्षण ठरले.
- प्रात्यक्षिकांच्या अखेरीस भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्रात रबरी बोटीच्या सहाय्याने येत दुश्मनांची चौकीला बॉम्ब च्या साह्याने उडून दिले. हा जबरदस्त धमाका पाहून नागरिक अचंबित झाले होते.
- ध्रुव, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर बरोबर तेजस, डॉर्नियर, मिग 29 के आदी लढाऊ विमानांनी आपल्या कसरती दाखविल्या. सरते शेवटी सनसेट सेरेमनी संपन्न झाली यावेळी राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. त्याचप्रमाणे सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचीही धुन वाजविली. त्यानंतर समुद्रात नौदलाच्या युद्ध नौकांवरील रोषणाई सुरू झाली. ही रोशनाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
- नौदलाच्या आजच्या दिवसाच्या कसरतींचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रम स्थळाच्या दोन्ही बाजूला सुमारे दीडशे मीटर लांब या नागरिकांना थांबविण्यात आले होते या ठिकाणी नागरिकांना आवरण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.