बाजार समितीतील विजयाने आघाडीमध्ये नवचैतन्य
By Admin | Published: September 14, 2015 11:50 PM2015-09-14T23:50:03+5:302015-09-14T23:52:33+5:30
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : वैभववाडी, दोडामार्ग नगरपंचायतीसाठी सुरू झाली मोर्चेबांधणी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने आपले एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. १९ पैकी १८ जागा मिळवून सेना-भाजप युतीला क्लिन स्वीप केले. त्यामुळे आघाडीच्या पर्यायाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. जिल्ह्याची दोन टोके असलेल्या वैभववाडी आणि दोडामार्ग या दोन्ही नगरपंचायतींच्या तोंडावर काँग्रेसला मिळालेले हे यश त्यांचा उत्साह वाढविणारे ठरणार आहे.
देशात आणि राज्यात युतीची सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी भाजप-सेनेचे प्राबल्य असताना सिंधुदुर्गात गेल्या विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करत भाजप-सेनेचा वारू कायमच रोखण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले आहे.
याला फक्त ग्रामपंचायत निवडणुका अपवाद मानल्या जातात. कारण ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कुडाळ, सावंतवाडी या दोन तालुक्यात शिवसेनेने मोठी मुसंडी मारली होती. मात्र, ते वगळता जिल्हा बँक निवडणूक, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि रविवारी झालेली कृषी उप्तन्न बाजार समितीची निवडणूक असो या सर्वच ठिकाणी काँग्रेस आणि पर्यायाने आघाडीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९९0 पासून नारायण राणेंचे राज होते. म्हणजे ते शिवसेनेत असताना आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये सातत्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख केंद्रस्थाने त्यांच्या मागेच सत्ताकेंद्रीत होती. गेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ वर्षात पहिल्यांदाच मोठा बदल झाला आणि जनतेने शिवसेनेच्या झोळीमध्ये मोठे यश दिले. परंतु भाजपाची पिछेहाट झाली. त्यामुळे येथील जनतेला नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबतचे विश्लेषण करणे धोक्याचे ठरेल. एका बाजूने कुडाळ-मालवणमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूने नीतेश राणे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे विजयाचा आनंद दोन्ही बाजूंनी साजरा करणे अवघड झाले होते. म्हणजे सिंधुदुर्गतील जनता ही गृहीत धरून राजकारण करणे प्रत्येकालाच अवघड जाणारे ठरत आहे.
नारायण राणेंचा पराभव झाला. त्यामागे वेगवेगळी कारणे असतील, परंतु त्या काळात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ठेकेदारीमधून गेलेल्या गलथाण कारभाराचा सर्व फटका राणेंना बसला. मागील दहा वर्षात ‘कमीशन’साठी या ठेकेदार पुढाऱ्यांनी गावागावातील विकासकामांमध्ये केलेला भ्रष्टाचार, रस्त्यांची व इतर कामांमध्ये केलेल्या सर्व घोळांना आळा बसण्यासाठी या ठेकेदारांवरील राग राणेंच्या मतदानाच्यावेळी उमटला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ता बदल झाल्यानंतर गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत लोकांच्या अपेक्षेप्रमाणे युतीकडून कारभार होताना दिसत नाही. त्यात भाजप आणि शिवसेना अंतर्गत राज्यपातळीवर असलेले कुरबोडीच्या राजकारणामुळे लोकांच्या अपेक्षांना ब्रेक लागल्यासारखे आहे. त्याचा फटका मात्र, सिंधुदुर्गवासीयांना बसत आहे. मागील काँग्रेस आघाडी शासनाच्यावेळी काही मुद्दांवर काँग्रेसच्या नेत्यांनाच लोकांसाठी रस्त्यावर उतरावे लागत होते. त्याप्रमाणे यावेळी जिल्हा प्रशासनाच्याविरोधात काही वेळा सत्ताधारी पक्षातील आमदार वैभव नाईकांनादेखील आंदोलनात्मक पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे सत्ता जरी बदलली तरी येथील जनतेच्या ईच्छा, आकांक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत.
इकीकडे महागाई व इतर मुद्यांवर लोकांचा नव्या शासनाकडून झालेला भ्रमनिरास आहेच. त्यात युतीच्या नेत्यांमध्ये दररोज विस्तवही जात नसल्याने जनतेमध्ये असलेल्या नाराजीचे प्रतिबिंब आगामी काळात उमटताना दिसणार आहे.