नौदल दिन: सिंधुदुर्गच्या समुद्रात विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य युद्धनौका येणार?

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 24, 2023 06:14 PM2023-11-24T18:14:03+5:302023-11-24T18:15:27+5:30

तेजस, मिग एअरक्राफ्ट दणाणून सोडणार आसमंत

Navy Day: Aircraft carrier INS Vikramaditya to arrive in Sindhudurg sea | नौदल दिन: सिंधुदुर्गच्या समुद्रात विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य युद्धनौका येणार?

नौदल दिन: सिंधुदुर्गच्या समुद्रात विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य युद्धनौका येणार?

मालवण (सिंधुदुर्ग) : नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवणकडे रवाना झाला आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र क्लासच्या जवळपास ८ मोठ्या युद्ध नौका, तर १० ते १२ छोट्या युद्ध नौका तारकर्लीच्या समुद्रात दाखल होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौकासुद्धा या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात चार विनाशिका, चार फ्री-गेट्स, सहा कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, आठ जलद हल्ल्याच्या युद्धनौका सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ध्रुव हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, चेतक, सी किंग हे हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखविणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून नौदलाकडून रंगीत तालीम सुरू होणार आहे. त्यात हा ताफा सामील होणार आहे.

तारकर्लीच्या समुद्रात नौदलाकडून कसरती

नौदलाचे मरीन कमांडो पॅराशूटमधून खाली उतरत समुद्रात विविध कसरती करताना पाहावयास मिळणार आहेत. युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशी विविध प्रात्यक्षिके ४ डिसेंबरला सायंकाळी तारकर्ली समुद्रात पाहावयास मिळणार आहेत. त्याआधी या कार्यक्रमाची रंगीत तालीम २७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी नौदलाचा ताफा रवाना झाला आहे. बहुतांश युद्धनौका मुंबईतील तळावरून जातील तर काही युद्धनौका कारवार येथील विमानवाहू युद्धनौकेच्या ताफ्यातील असतील.

कोकण-गोवा समुद्रात अतिसुरक्षेचा बावटा

कुठल्याही विशेष कार्यक्रमावेळी युद्धनौकांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. एरव्ही असे कार्यक्रम मुंबईत होताना मुंबईशी निगडित समुद्रात सुरक्षेचा बावटा नौदलाकडून जाहीर केला जातो. आता २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान युद्धनौका तळकोकणातील समुद्रात नांगरणीला असतील. त्यामुळे कोकण-गोवा समुद्रात अतिसुरक्षेचा बावटा लावला जाण्याची शक्यता आहे.

हरीश कुमार यांची उपस्थिती

नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांबरोबरच नौदलाचे चीफ ॲडमिरल आर. हरिषकुमार, पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, जनरल अनिल चव्हाण आदी अधिकारी उपस्थित असणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शामियान्याच्या संरक्षणासाठी जीओ ट्यूबचा बंधारा..

अतिमहनीय व्यक्तींसाठी उभारला जाणाऱ्या शामियान्याच्या सुरक्षिततेसाठी समुद्रात सुमारे १३० मीटर लांबीचा जिओ ट्यूबचा बंधारा बांधण्याचे काम चालू आहे. यामध्ये १० मीटर लांबीच्या १३ जिओ ट्यूब वापरण्यात आल्या आहेत. या जिओ ट्यूबच्या बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांपासून मुख्य शामियान्याचे संरक्षण होणार आहे.

Web Title: Navy Day: Aircraft carrier INS Vikramaditya to arrive in Sindhudurg sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.