नौसेना दिनाची रूपरेषा चार दिवसात स्पष्ट होणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 21, 2023 12:54 PM2023-11-21T12:54:13+5:302023-11-21T12:56:06+5:30
मालवण : मासेमारी, पर्यटन आणि ठराविक रस्त्यांवरील वाहतुकीबाबतची अंतिम रुपरेषा येत्या चार दिवसांत जाहीर केली जाईल. त्याबाबतचा अधिकृत व्हिडीओ ...
मालवण : मासेमारी, पर्यटन आणि ठराविक रस्त्यांवरील वाहतुकीबाबतची अंतिम रुपरेषा येत्या चार दिवसांत जाहीर केली जाईल. त्याबाबतचा अधिकृत व्हिडीओ प्रशासनाकडून प्रसारित केला जाईल, त्याचप्रमाणे नौदल दिनामुळे ठराविक भागात काही निर्बंध लागू झाले, तरी नौसेना दिनामुळे भविष्यात मालवणला खूप मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती विभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी येथे दिली.
नौसेना दिन कार्यक्रमाबाबत पोलिस विभागाकडून नागरिकांशी संवाद साधला जात आहे. यानिमित्ताने घनश्याम आढाव म्हणाले, नौसेना दिनाचे महत्त्व आणि अती महनीय व्यक्तीच्या आगमनामुळे सुरक्षा व्यवस्था कडक असणार आहे. साहजिकच दैनंदिन कामकाजावर काही निर्बंध येणार आहेत. तरी नौदल दिन यशस्वीतेसाठी -काही दिवस लोकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागेल.
राजकोटमधील नौका अन्यत्र हलविण्याचे आवाहन
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ४ डिसेंबर रोजी अती महनीय व्यक्तींचे आगमन होणार असल्याने राजकोट समुद्रातील मासेमारी नौका तसेच येथील बंधारा कम रस्त्यावरील नौका मुख्य बंदरात किंवा अन्यत्र हलविण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून संबंधित मच्छीमारांना करण्यात आल्या आहेत.
जलपर्यटनाच्या रूपरेषेबाबत चार दिवसांत अंतिम निर्णय
पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, ३० नोव्हेंबरपासून नौदलाकडून तारकर्ली समुद्रात विविध प्रात्यक्षिके सुरू होतील. ही प्रात्यक्षिके स्थानिकांना पाहता येतील. त्यामुळे २८ नोव्हेंबरपासून नौदलाची जहाजे मालवणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सर्जेकोट ते देवबाग दरम्यानच्या समुद्रात मासेमारी आणि सागरी जलपर्यटनाची रुपरेषा कशी असेल, याविषयी येत्या चार दिवसांत अंतिम निर्णय होईल.
‘नो मेन्स झोन’
मालवण ते तारकर्ली दरम्यानचा जो काही मार्ग अती महनीय व्यक्तींसाठी निवडला जाईल, व त्या रस्त्यावर ४ डिसेंबर रोजी कडक सुरक्षा व्यवस्था असेल. कदाचित तेवढ्या वेळेपुरता तो ' नो मेन्स झोन ' असेल. जेथे अती महनीय व्यक्तींची उपस्थिती असेल, त्याच्या आजूबाजूला परिसरही ह ' नो मेन्स झोन ' म्हणून त्यादिवशी घोषित केला जाईल. बहुधा या मार्गावरील बससेवा एक ते दोन दिवस बंद राहू शकते. रुग्णवाहिका सारखी अत्यावश्यक वाहतूक सुरू राहील. सोमवार, ४ डिसेंबर रोजी आठवडा बाजार बंद असेल, तर मालवण शहर आणि आजूबाजूच्या शाळांना सुटी देण्यात येईल. नौदल दिन ह यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन कोल्हे यांनी केले.