Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 27, 2024 02:06 PM2024-08-27T14:06:10+5:302024-08-27T14:07:23+5:30

मंत्री केसरकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा

Navy officials inspect the fallen statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajkot | Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

मालवण: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा हदरली आहे. हा पुतळा उभारण्यात भारतीय नौदलाने पुढाकार घेतला असल्याने नौदलाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आज, मंगळवारी सकाळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. याबाबत लवकरच एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असून हा अहवाल नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्या नजिक राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्याची आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. 

पुतळा उभारण्याच्या कामात शासनाशी समन्वयक म्हणून लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांनी काम पाहिले होते. याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट येथे येत कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. या पाहणीची माध्यमांपासून गुप्तता पाळण्यात आली होती. 

मंत्री केसरकर यांच्याशी नौदल अधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा..

राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची पाहणी केल्या नंतर नौदल अधिकाऱ्यांनी मालवण तहसील कार्यालय येथे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकंदरीत परिस्थिती बाबत बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान या चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. घटनेची पाहणी अंती वरिष्ठांना त्याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Navy officials inspect the fallen statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.