नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ सिंधुदुर्गच्या समुद्रात आणणार; निवृत्त युद्धनौकेचे अंडरवॉटर म्युझियम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:09 AM2024-12-01T10:09:58+5:302024-12-01T10:10:10+5:30
आर्टिफिशिअलमध्ये होणार रूपांतर; पाणबुडीतून पाहता येणार समुद्राखालचे विश्व
संदीप बोडवे
मालवण : मालवण - वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ स्थापित करण्याचे अखेर निश्चित झाले आहे. सध्या ही युद्धनौका नौदलाच्या अंदमान-निकोबार कमांडरच्या ताब्यात आहे. युद्धनौकेच्या हस्तांतरणासाठी डिसेंबर अखेरपर्यंत राज्य आणि केंद्रीय पर्यटन विभागाबरोबरच नौदलाचे उच्चपदस्थ अधिकारी अंदमानला भेट देणार असल्याचे समोर आले आहे.
पर्यटनात अनेकांच्या आयुष्यात समृद्धी आणण्याची क्षमता आहे. अधिकाधिक लोकांना ‘इनक्रेडिबल इंडिया’च्या चमत्कारांचा अनुभव घेता यावा, यासाठी आमचे सरकार भारतातील पर्यटनातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी भारताच्या पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात २३ राज्यांमध्ये ४० पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देत निधीची घोषणा केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित आर्टिफिशियल व अंडरवॉटर म्युझियमचा समावेश आहे.
कसा असेल अंडर वॉटर प्रकल्प
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ ही अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी पाण्यात स्थापित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. समुद्राच्या पाण्याखालील युद्धनौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. जागतिक पर्यटन संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून, समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.
आयएनएस गुलदार’विषयी
सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवलेली भारतीय नौदलाची ‘गुलदार’ ही युद्धनौका १२ जानेवारी रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून पोर्ट ब्लेअर येथून कार्यमुक्त करण्यात आली. आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजाने अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे.