'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:37 PM2022-12-01T15:37:23+5:302022-12-01T15:38:45+5:30
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी कुडाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेत नसत. हल्लीच अचानक नाव घ्यायला सुरुवात केली आहे. व्यासपीठावरही फक्त शाहू-फुले-आंबेडकरांच्या प्रतिमा. पण ज्यांच्या प्रेरणेवर शाहू-फुले-आंबेडकर विचार आहे त्या आमच्या शिवछत्रपतींची प्रतिमाही कुठे नसायची, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी कुडाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.
जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. काही जण राजकीय स्वार्थासाठी इतिहास वापरत आहेत. राष्ट्रवादीच्या जन्मापासून, साल १९९९ पासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं, असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला.
राज ठाकरेंनी यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक जयसिंगजी पवार यांचे देखील आभार मानले आहेत. जयसिंगरावांनी काल एका मुलाखतीत माझं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अशा थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद मिळणं ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच आम्हाला दोघांनाही इतिहासाचं कुतूहल असल्यामुळे आमची इतिहासावर सविस्तर चर्चा झाल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा आंबोली मार्गे सावंतवाडीत दाखल झालेल्या राज यांचे मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जोरदार स्वागत केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेत्या अनिता माजगावकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहर प्रमुख आशिष सुभेदार, अनिल केसरकर, दया मेस्त्री यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
राज ठाकरे यांचे सावंतवाडी मध्ये आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांची एक छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ठाकरे यांनी काही क्षण गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना व नागरिकांना अभिवादन केले, त्यानंतर ते शिवाजी चौकातून थेट बाजारपेठ मार्गे मनसे कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांना मोती तलावाचे सौंदर्य ही चांगलेच भावले. कार्यालयात प्रवेश करताच उपस्थित कार्यकर्त्यांना रामेश्वर प्लाझा या मुख्य बाजारपेठेतील इमारतीमध्ये जागेचे दर काय, आपल्याला तिथे कार्यालय करायचे आहे, असे सांगत उपस्थितांना सुखद धक्का दिला.जागेचा दर विचारा असेही सांगितले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"