कणकवलीत राष्ट्रवादीकडून तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:22 PM2021-07-05T18:22:30+5:302021-07-05T18:28:15+5:30
NCP Kankavali Sindhudrg : गेल्या ६५ वर्षात केव्हा नव्हे तेवढी इंधन दरवाढ यावर्षी झाली आहे . त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .
कणकवली : केंद्र शासन दिवसेंदिवस पेट्रोल , डीझेल , घरगुती गॅसची दरवाढ करीत आहे . त्यामुळे सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाले असून , त्यांचे जीवनमान हे फार हालाकीचे झाले आहे . तसेच या दरवाढीमुळे सर्वस्तरावर खर्च वाढला आहे . विविध प्रकारची वाहतुक पेट्रोल ,डीझेल, गॅसवर अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम जिवनोपयोगी वस्तूंच्या किंमती वर झाला आहे . गेल्या ६५ वर्षात केव्हा नव्हे तेवढी इंधन दरवाढ यावर्षी झाली आहे . त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेकणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .
तसेच या इंधन दरवाढीच्या विरोधात तहसीलदार आर.जे. पवार यांना निवेदन देखील देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की , शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत . या दरवाढीमुळे सर्वसाधारण नागरिक हैराण झाले असून त्यांना जगणे मुश्कील झाले आहे . तसेच सर्वसामान्य माणूस केंद्र सरकारवर नाराज आहे . नागरिकांच्या या भावना आपल्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात . अन्यथा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरून दरवाढ कमी होईपर्यंत आंदोलन करेल. असा इशारा यावेळी देण्यात आला .
यावेळी तहसीलदारांशी चर्चा करताना कोविड काळात खाजगी कोविड सेंटरकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचा आरोप अनंत पिळणकर यांनी केला . तसेच दर नियंत्रण समितीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले . यासंदर्भात कोविड रुग्णांची बिले योग्य प्रकारे तपासणी करा व रुग्णांचे अवाजवी घेतलेले पैसे परत करा . अन्यथा दर नियंत्रण समितीच्या विरोधात राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील पिळणकर यांनी दिला .
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद मर्गज , तालुकाध्यक्ष राजू पावसकर , जिल्हा चिटणीस रुपेश जाधव , युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग , कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर , दिगवळे जिल्हा परिषद मतदारसंघ विभाग अध्यक्ष अशोक पवार , मारुती पवार , चंद्रकांत नाईक , सेनापती सावंत , उत्तम तेली , किरण कदम , अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अनवर साठी , सुजल शेलार , विनोद विश्वेकर, बंड्या शेवणी , राजेश पाताडे आदी उपस्थित होते . दरम्यान, तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्यावतीने निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .