राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सावंतवाडी कार्याध्यक्षाने संपवले जीवन, नेमकं कारण अस्पष्ट
By अनंत खं.जाधव | Published: August 20, 2024 05:01 PM2024-08-20T17:01:00+5:302024-08-20T17:03:05+5:30
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्ष, तरूण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी (वय ४४ रा. वैश्यवाडा सावंतवाडी) यांचा सावंतवाडी शहरातील ...
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्ष, तरूण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी (वय ४४ रा. वैश्यवाडा सावंतवाडी) यांचा सावंतवाडी शहरातील मोती तलावात मृतदेह आढळून आला. राकेश यांनी टोकाचे पाऊल का उचलले यांचे गुढ अद्याप उलगडले नाही.
आत्महत्या करण्यापूर्वी राकेशने आपल्या मित्रांना भेटून मी चाललो भाडू नका असा संदेश दिला होता. ते शेवटचे शब्द ऐकून अनेकांचे हदयपिळवटून जात होते. राकेश हा व्यापार क्षेत्रात असला तरी तो राजकीय सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्षपदाची त्याच्याकडे जबाबदारी होती.
राकेश हा सोमवारी सकाळी बेपत्ता झाले होते. काही वेळानंतर त्यांची दुचाकी व चप्पल न्यायालयाच्या आवारात असलेल्या तलावाच्या काठावर आढळून आले होते. त्यानंतर दिवसभर बाबल आल्मेडा टिम व स्कुबा ड्रायव्हर्स यांनी शोधाशोध केली पण रात्री उशिरापर्यंत बेपत्ता राकेश सापडला नव्हता. आज, मंगळवारी सकाळी तलावात मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो राकेश नेवगी याचाच असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय पथकाकडून उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राकेश याने आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला होता. असे असतना टोकाचे पाऊल का उचलले यांचे मात्र गुढ उलगडले नाही. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली, अमित सामंत, अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी तसेच शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी नेवगी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. मृत राकेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणी असा परिवार आहे.