“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:50 PM2024-08-28T13:50:03+5:302024-08-28T13:50:48+5:30

NCP SP Group Jayant Patil In Malvan: शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल, असा विश्वास व्यक्त करत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

ncp sp group jayant patil said mahayuti govt should apologize on shivaji maharaj statue collapsed | “जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील

“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil In Malvan: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट मालवण गाठत परिसराची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी आणि राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली. 

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत काही मुद्दे उपस्थित केले. फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसे असते तर दोन-तीन झाड पडली असती पण तसे न होता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होते. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचे काम दिले. दीड-दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला ३५ फुटाच्या पुतळ्याचे काम दिले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला?

सरकार म्हणते पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. कल्याणमध्ये राहणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला सांगण्याचे काम कुणी केले. या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच हे काम करून घेतले. नौदलाने फक्त पुतळा पूर्ण करून आल्यानंतर तिथे बसविला. त्यामुळे संपूर्ण दोष राज्य सरकारचा आहे. नौदलाच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. केवळ आठ महिन्यात वादळ-वाऱ्याचा कोणताही अभ्यास न करता पुतळा उभारला गेला. त्यामुळे राज्य सरकारने आता जबाबदारी स्वीकारून राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 

कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करायला तयार नाही

सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा कसा दाखल केला? गुन्हा दाखल करणे म्हणजे आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप सरकार करत आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सरकार काम फक्त टेंडर काढणे, जवळच्या लोकांना कंत्राट देणे, त्या कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करायला तयार नाही असा आरोप त्यांनी केला तसेच सरकारने राज्यभरातील शिवप्रेमींची माफी मागावी, या शब्दांत जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, स्थानिक मंत्री म्हणतात की, या वाईटातून काहीतरी चागलं होईल. मला अशा मंत्र्यांच्या बुद्धिची कीव वाटते. मंत्री महोदय नक्कीच चांगलं होणार, शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल. ज्यांना २८ फुटाचा व्यवस्थित पुतळा उभारता आला नाही ते आता १०० फुटाची चर्चा करत आहेत, असा टोला लगावत, या प्रकरणाची जर सरकारला खरेच चौकशी करायची असेल तर दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी बसून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड करावी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 
 

Web Title: ncp sp group jayant patil said mahayuti govt should apologize on shivaji maharaj statue collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.