दीपक केसरकरांना राष्ट्रवादीचे निमंत्रण

By admin | Published: May 22, 2014 01:01 AM2014-05-22T01:01:12+5:302014-05-22T01:01:22+5:30

मात्र निर्णय नाही : कोअर कमिटीतही झाली चर्चा

NCP's invitation to Deepak Kesarkar | दीपक केसरकरांना राष्ट्रवादीचे निमंत्रण

दीपक केसरकरांना राष्ट्रवादीचे निमंत्रण

Next

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याने आमदार दीपक केसरकर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘झाले गेले गंगेला मिळाले’, असे म्हणत आमदार केसरकरांना प्रदेश राष्ट्रवादीच्या शुक्रवारी (ता. २३) होणार्‍या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. मात्र, केसरकरांनी बैठकीबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आज, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक सावंतवाडीत झाली. त्यात कोणता निर्णय झाला, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीत आमदार केसरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला उघडपणे विरोध केला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सावंतवाडीत येऊनसुद्धा केसरकर त्यांच्या भेटीसाठी गेले, पण काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले नाहीत. त्याचवेळी केसरकरांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. दुसरीकडे पक्षाध्यक्ष पवार यांनी सुद्धा आमदार केसरकर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांची हकालपट्टी केली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार १४ मे रोजी शरद भवनच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळीही आ. केसरकर यांचा अपमान केला होता. यामुळे कार्यकर्ते चांगलेच दुखावले गेले. त्यातच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आ. केसरकर यांनी शिवसेनेला ४१ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. या कोकणच्या निवडणुकीचे खरे हिरो आ. केसरकर ठरल्याने शुक्रवारी मुंबईत होणार्‍या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी आ. केसरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमंत्रण दिले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मात्र, बैठकीला उपस्थित राहायचे अथवा नाही, याबाबतचा निर्णय अद्यापही आ. केसरकर यांनी घेतलेला नाही. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक सावंतवाडीत पार पडली. या बैठकीला माजी आ. शंकर कांबळी, राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवाजी कुबल, नितीन वाळके, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हाध्यक्षा अनारोजीन लोबो, आदींसह आ. केसरकर उपस्थित होते. परंतु, या बैठकीत कोणता निर्णय झाला, याबाबत उशिरापर्यंत काही कळले नाही. याबाबत आ. केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, शुक्रवारच्या बैठकीचे निमंत्रण मला मिळालेले आहे. परंतु, जाणार का नाही, याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. माझी उद्या, गुरुवारी मुंबईत बैठक आहे. त्यानंतरच मी पुन्हा माझ्या सहकार्‍यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. मी कुठलाच निर्णय न घेता विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's invitation to Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.