पाणी टंचाई टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:28 PM2019-06-17T15:28:36+5:302019-06-17T15:29:21+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात खूप पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी असते. मात्र, पाणी साठविण्यासाठी विशेष अशी नियोजनबध्द व्यवस्था नसल्याने बऱ्याच प्रमाणात पाणी वाहून जाते. त्यामुळे कड़क उन्हाळा पडला तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची स्थिति निर्माण होते. त्यानंतरच पाण्यासाठी उपाय योजना सुरु होतात. खरे तर ही स्थिति तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी असते. त्यामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
सुधीर राणे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात खूप पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी असते. मात्र, पाणी साठविण्यासाठी विशेष अशी नियोजनबध्द व्यवस्था नसल्याने बऱ्याच प्रमाणात पाणी वाहून जाते. त्यामुळे कड़क उन्हाळा पडला तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची स्थिति निर्माण होते. त्यानंतरच पाण्यासाठी उपाय योजना सुरु होतात. खरे तर ही स्थिति तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी असते. त्यामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
सिंधुदुर्गात शासकीय यंत्रणा उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवू नये म्हणून दरवर्षी कामाला लागलेल्या दिसतात. यामध्ये लोकप्रतिनिधीही सहभागी होत असतात. संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठक घेतली जाते. तसेच पाणी टंचाई आराखडेही बनविले जातात. त्यातून पाणी टंचाई असलेल्या अथवा पुढील काळात उद्भवू शकेल अशा ठिकाणी विंधन विहीर खोदणे , जुन्या नळयोजनेची दुरुस्ती करण्याबरोबरच नवीन नळयोजनेचे काम ही सुचवीले जाते. मात्र,सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत अनेकवेळा पुन्हा पावसाळा सुरु होतो.
त्यामुळे पाणी टंचाई आराखड्यातील ही कामे तशीच रहातात. अनेकवेळा ती कामे रद्द ही होतात. पुन्हा जानेवारी महीना जवळ आला की लोकप्रतिनिधिंबरोबर प्रशासन जागे होते. पुन्हा एकदा मागच्यावर्षाप्रमाणेच प्रक्रिया राबविली जाते. काही लोकप्रतिनिधींच्या चाणाक्ष पणामुळे त्यांच्या परिसरातील कामे पूर्ण होतात. मात्र,अनेक कामे तशीच शिल्लक रहातात.
त्यामुळे तेथील ग्रामस्थाना मुबलक पाण्या अभावी दिवस ढकलावे लागतात. त्याचे पडसाद पंचायत समिति सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सभेत उमटताना दिसतात. मात्र, असे घडत असले तरी पाणी टंचाई सारखी समस्या कायमची नष्ट होण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. तसेच पाण्याचे पुनर्भरण करण्यासारख्या उपायाकडेही दुर्लक्षच केले जाते.
पाण्याबाबत आता हळूहळू जागृती होत असून पाणी टंचाई आराखड़े तिन वर्षासाठी बनविण्यात यावेत अशी मागणी काही लोकप्रतिनिधी करु लागले आहेत. त्यांच्या मताचा आदर करीत प्रशासकीय पातळीवरही त्याबाबत सकारात्मकता दाखविली जात आहे. याबाबतचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. मात्र, पाणी साठविण्यासाठी सप्टेंबर महिन्या पासूनच नियोजन करण्यावर भर द्यायला हवा.
नद्या, ओहोळ यांच्यावर बंधारे बांधण्याबाबत आतापासूनच नियोजन झाले आणि त्याप्रमाणे कृती केल्यास चांगल्या प्रकारे पाणी साठा होऊ शकेल. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. उन्हाळा सुरु झाला की, पाणी अडविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे तसे परिपूर्ण नसतात. त्यामुळे पाण्याचा साठा ही म्हणावा तसा होत नाही.
अलीकडे काही ठिकाणी पाणी वाचविण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. पावसाचे प्रमाण वाढावे यासाठी वृक्षारोपण करण्यावर ही भर दिला जात आहे. त्याच बरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही पर्याय स्वीकारला जात आहे. हा एक पावसाचे पाणी संकलित करण्याचा उपाय आहे. ज्या ठिकाणी असा उपाय योजण्यात आला असेल त्या परिसरातील विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याच्या पातळीत निश्चित वाढ झाल्याचे दिसून येते.
छोटी तळी तयार करण्यावरही भर दिला जात आहे.त्याच बरोबर नद्या, नाले,ओहोळ यांच्यावर बंधारे बांधण्यात येत आहेत. हे सर्व उपाय योग्य असले तरी आपल्याकडे असलेल्या पाण्याचा योग्य वापर करून त्याची बचत करणेही तितकेच महत्वाचे आहे. लहान थोर मंडळींनी याकडे लक्ष द्यायला हवा. आपण कोणताही विचार न करता दिवसभर पाणी वापरत असतो. त्यातील बरेचसे पाणी वाया घालवीत असतो. हे कटाक्षाने टाळायला हवे.
इतर उपाय योजनांप्रमाणे शालेय मुलांना पाण्याचे महत्व पटवून दिले तर ते पाणी वाचविण्यात महत्वाचे पाऊल ठरू शकेल. अगदी छोट्या छोट्या कृतीतूुन पाणी कसे वाचवायचे हे या मुलांना शिकविणे गरजेचे आहे. रस्त्याने जाताना एखादा सार्वजनिक नळ उघडा राहिलेला दिसला तर ही मुले स्वतः पुढाकार घेऊन तो बंद करतील. त्यावेळी आपल्या मोहिमेला खरे यश मिळाल्यासारखे होईल.
पिण्यासाठी पाणी पेल्यात घेताना अर्धेच भरून घेणे, संध्याकाळी शाळेतून आल्यावर पाण्याच्या बाटलीतले उरलेले पाणीही वाया न घालवता त्याचा पुनर्वापर करणे. अशा गोष्टी मुलांना शिकवल्यास तसेच पाण्याचे महत्व त्यांना पटवून दिल्यास, त्यांच्या मध्ये जागृती होऊन जलसाक्षरता खऱ्या अर्थाने रूजेल. आणि ही आपल्या देशाची भावी पीढ़ी पाणी वाचविण्यासाठी निश्चितच आटोकाट प्रयत्न करेल.आणि इतरांनाही करायला लावेल.त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई उद्भवण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच बरोबर पुढील काळात पाण्यावरुन होणारा संघर्ष टाळता येईल.