वैभवसंपन्न विकास आराखड्याची गरज

By admin | Published: October 15, 2015 10:09 PM2015-10-15T22:09:18+5:302015-10-16T00:58:54+5:30

‘गावपण’ टिकविण्याचे आव्हान : पायाभूत सुविधांमुळे जीवनमान उंचावण्याची संधी

The need for a blueprint development plan | वैभवसंपन्न विकास आराखड्याची गरज

वैभवसंपन्न विकास आराखड्याची गरज

Next

प्रकाश काळे- वैभववाडी--ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाल्याने विकासाची कवाडे आपोआपच खुली झाली आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे वाटचाल करताना ‘गावपण’ हरवले जाणार नाही, याची खबरदारी घेत नगर विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगरपंचायतीच्या शिलेदारांवर येणार आहे. पहिल्या आणि तितक्याच महत्त्वकांक्षी विकास आराखड्यात बाजारपेठेत सुशोभिकरणासह दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कौशल्य पणास लावून स्वच्छ, सुंदर आणि वैभवसंपन्न वैभववाडी नगरी बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची किमया करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
ग्रामपंचायतीचे मर्यादित अधिकारक्षेत्र आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वैभववाडी शहराचा नियोजनबद्ध विकास काहीसा अडखळला होता. त्याला अपुरा निधी कारणीभूत ठरला. नगरपंचायतीमुळे अधिकाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे अडखळलेल्या शहर विकासाला पुन्हा एकदा नव्या जोमाने धुमारे फुटू लागले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या तिजोरीतून नगराच्या विकासासाठी थेट निधी उपलब्ध होणार असल्याने पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेच्या मध्यस्थीसाठी कुणापुढे उगाच हात पसरण्याची वेळ येथील नागरिकांवर येणार नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा, सांस्कृतिक चळवळ निर्माण करताना एकोपा, आपुलकी आणि शांतता टिकवून वाटचाल करावी लागणार आहे.
शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच बाजारपेठत वाढत चालली आहे. शहर विस्तारताना नगररचनेच्या नियमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाले. निवासी संकुले उभारण्यासाठी घेतलेल्या अकृषक परवान्यातील अटी शर्ती पायदळी तुडविण्यात आल्या. अकृषक जमिनीतील खुले कुठेही आढळत नसल्याने सार्वजनिक गरजेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी भविष्यात जागेची अडचण होणार आहे. आधीच्या चुकांचा अभ्यास करून त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरपंचायतीने कडक धोरण राबवण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच बकालपणाही वाढलेला दृष्टीस पडला तर आश्चर्य वाटायला नको.

स्वतंत्र भाजीमार्केट : मासळी मार्केटची गरज
वाभवे-वैभववाडी शहराचे सध्याचे क्षेत्र मर्यादित असले तरी नगरपंचायतीमुळे होणारा विस्तार लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र भाजी मंडई आणि पक्के मासळी मार्केट उभारण्यासाठी नगरपंचायतीला पुढाकार घ्यावा लागणार आहे. सध्या मुख्य रस्त्यावर भरणाऱ्या मासळी बाजारामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

मासळीच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या आराखड्यात मासळी मार्केटचा अंतर्भाव करावा लागणार आहे. आठवडा बाजारासाठी वाहतुकीवर परिणाम न करणारी आणि नागरिकांना सोयीची ठरणारी जागा शोधून तेथे सध्या रस्त्यावर भरणारा बाजार स्थलांतरित करण्याची गरज आहे.

करमणुकीच्या सुविधांची वानवा
वाभवे-वैभववाडी तालुक्याचे मुख्यालय असले तरी येथे सांस्कृतिक चळवळ रुजली नाही. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात तालुक्याचे मागासलेपण ठळकपणे समोर येते. नगरपंचायत झाल्यामुळे सांस्कृतिक चळवळ निर्माण करतानाच इतरही करमणुकीच्या सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी नाट्यगृह, सिनेमागृह उभारावे लागणार आहे. शहरात उद्यान, बगीचा तसेच खेळाचे मैदान या सुविधांची अत्यंत निकड आहे. मात्र, त्यासाठी सद्यस्थितीत शासकीय जागा उपलब्ध नसल्याने या सुविधा निर्माण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज वाचनालयाचीही गरज आहे.


सांडपाण्यासाठी पक्क्या गटारांची गरज
नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ अरुंद रस्ते आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करून आत्ताच या रस्त्यांचे भूसंपादन करुन रुंदीकरणासह मजबूतीकरणसुद्धा करणे आवश्यक असून त्याचबरोबर पाणीपुरवठा व सांडपाणी निचऱ्यासाठी पक्क्या गटारांची गरज आहे.

बाजारपेठ सुशोभिकरण हवे
बाजारपेठच्या विस्तारीकरणामुळे येथील पायाभूत सोयी सुविधांचे प्रश्न वाढीस लागले आहेत.
करोडो रुपये खर्च होवूनही वैभववाडी शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.
शासकीय भुखंडांवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
शहरातील अनिर्बंध टपऱ्यांमुळे बकालपणात भर पडत आहे.
त्यामुळे शहराचे सुशोभिकरण करताना नगरपंचायतीने टपऱ्या काढून त्याजागी पक्क्या शेडचे बांधकाम करुन त्याच गोरगरीबांना भाडेपट्टीने दिल्यास शहराचा बकालपणाही कमी होईल.
त्यातून कररूपाने नगरपंचायतीच्या तिजोरीत भरही पडू शकते.
त्यामुळे नगरविकासाच्या आराखड्यात टपऱ्यांच्या मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.

Web Title: The need for a blueprint development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.