दोडामार्गला सक्षम नेतृत्वाची गरज

By admin | Published: June 26, 2016 11:40 PM2016-06-26T23:40:09+5:302016-06-27T00:35:30+5:30

संधीचा अभाव : अनेक नेत्यांमध्ये नेतृत्वाचे गुण; दिग्गज राजकारणी असतानाही विकास खुंटला

The need for capable leadership in Doda road | दोडामार्गला सक्षम नेतृत्वाची गरज

दोडामार्गला सक्षम नेतृत्वाची गरज

Next

वैभव साळकर---दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन अठरा वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप तालुक्याची विकास प्रक्रिया मंद गतीनेच सुरू आहे. तालुक्याच्या या मंदावलेल्या विकासामागे सक्षम नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. तालुक्यात सुरेश दळवी, एकनाथ नाडकर्णी, बाबुराव धुरी, राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठल्येकर यासारखे दिग्गज राजकारणी असतानाही त्यांना राज्यात तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. परिणामत: तालुक्याचा विकास मात्र धीमाच राहिला. त्यामुळे जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या तालुक्याच्या विकासाकरीता सक्षम नेतृत्वाची गरज आहे. तालुकावासियांना भविष्यात आपल्याला सक्षम नेतृत्व मिळेल, अशी आशा आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांचा त्रिवेणी संगम साधणारा तालुका म्हणजे दोडामार्ग अशी राज्यभरात दोडामार्ग तालुक्याची ओळख आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या येथील लोकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी ससेहोलपट पाहून स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्मितीची चळवळ उभी राहिली आणि या चळवळीला २७ जून १९९९ रोजी यश आले.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखंड असलेल्या सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यामुळे इथल्या लोकांसाठी विकासाची कवाडे खुली झाली. पण त्यानंतर आजमितीला अठरा वर्षे पूर्ण झाली तरी इथला विकास मात्र निम्म्यावरच आहे. त्यामागची कारणमिमांसा केल्यास तालुक्याला सक्षम नेतृत्व न लाभल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकर्षाने समोर येते.
तालुका निर्माण झाल्यानंतर तहसील व पंचायत समिती कार्यालये सुरू झाली. मात्र, सुरूवातीची पाच वर्षे प्रभारी अधिकाऱ्यांवरच तालुक्याचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यामुळे विकास प्रक्रिया गतिमान झाली नाही. तालुक्याच्या मुख्यालय इमारतीसाठी असो अथवा न्यायालयासाठी, तालुकावासियांना तब्बल १४ वर्षे वाट पहावी लागली. येथील बसस्थानक तर तब्बल १७ व्या वर्षी पूर्ण झाले. तालुका निर्माण झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षातच खरे तर ही कामे पूर्ण व्हायला हवी होती. विविध शासकीय कार्यालये, त्यांना लागणारा अधिकारीवर्ग तालुक्यात यायला हवा होता. पण तसे झाले नाही. विविध शासकीय कार्यालये तालुक्यात येण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला. साहजिकच इथली विकास प्रक्रिया मागे गेली. त्यामुळे आज अठरा वर्षांनंतरही तालुक्याला सर्वांगिण विकासाची प्रतीक्षा आहे. त्याकरिता सक्षम नेतृत्व मिळणे ही काळाची गरज आहे. तालुक्यात सुरेश दळवी, एकनाथ नाडकर्णी, बाबुराव धुरी, राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठल्येकर असे एकापेक्षा एक धुरंधर राजकारणी आहेत. ज्यांच्यामध्ये नसानसात नेतृत्वाचे गुण भरले आहेत. मात्र, यापैकी एकालाही राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. ज्या संधी उपलब्ध झाल्या, त्या कमी प्रमाणात अल्प कालावधीसाठी मिळाल्या. त्यामुळे सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे इथला विकास रेंगाळला. आज तालुक्यात युवा नेते मंडळीही आहेत. दोडामार्गचा विकास सध्या तरी निम्म्यावरच आहे. भविष्यात विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असल्याने इथल्या पर्यटन, उद्योग व शैक्षणिक क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास नक्कीच दोडामार्ग सुजलाम्-सुफलाम् बनण्यास वेळ लागणार नाही.


दोडामार्गवासियांना मोठ्या अपेक्षा
संतोष नानचे, चेतन चव्हाण, प्र्रेमानंद देसाई यासारखी युवा मंडळी दोडामार्ग तालुक्यात आहेत. भले राजकीय पक्ष वेगवेगळे असले, तरी नेतृत्व करण्याचे गुण ठासून भरले आहेत. त्यामुळे या सर्वांकडून दोडामार्ग तालुकावासियांना मोठ्या अपेक्षा आहेत.


दोडामार्ग तालुक्यात अनेक मातब्बर राजकीय व्यक्तीमत्त्वे आहेत. पण त्यांना नेतृत्त्व करण्याची संधी राज्यस्तरावर मिळालेली नाही. तालुक्याला राजकीय नेतृत्त्व न लाभल्याने इथली विकासप्रक्रीया कुर्म गतीने सुरू आहे. त्याचाच परीणाम म्हणुन शासकीय कार्यालये तालुक्यात सुरू होण्यास विलंब लागला. सध्यातरी विकासाच्या बाबतीत निम्म्यावर असलेल्या तालुक्याला सर्वांगीण विकासाकडे नेण्याकरीता तालुक्यातच राजकीय दृष्टया सक्षम नेतृत्त्व घडणे गरजेचे आहे. तरच गतिमान विकास प्रक्रीया राबविणे शक्य होईल.
- आनंद कामत, दोडामार्ग

Web Title: The need for capable leadership in Doda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.