आवश्यकता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची
By admin | Published: September 7, 2015 11:14 PM2015-09-07T23:14:39+5:302015-09-07T23:14:39+5:30
वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध डॉक्टर्स यांचे प्रमाण व्यस्त आहे.उपलब्ध मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न -जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर --
जिल्हा शल्यचिकित्सक बी. डी. आरसूळकर निराज्यातील अन्य जिल्ह्यात आजारांवरील उपचाराच्या खासगी सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे तेथील जिल्हा रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जाण्याची रुग्णांची मानसिकता मोठी आहे. मात्र, १८८५ साली रत्नागिरीत सुरू झालेल्या व १३० वर्ष पूर्ण केलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर जिल्हावासियांचा मोठा विश्वास आहे. जिल्हाभरातून या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे व येथील उपचारांवर विश्वासही आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात प्रथम श्रेणीतील मंजूूर १९ डॉक्टर्स पदांपैकी केवळ ४ पदेच भरलेली आहेत. द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील असंख्य पदेही रिक्त आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध डॉक्टर्स यांचे प्रमाण व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांच्याशी संवाद साधला असता उपलब्ध मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयातील प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन या श्रेणीतील उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अधिक सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत डॉक्टर्सची सेवा रुग्णांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जात आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे याद्वारे रुग्णांना अनेक आजारांवर उपचार देण्याची चांगली व्यवस्था जिल्हा रुग्णालयात आहे. उत्तम उपचारासाठी अद्ययावत विभागही निर्माण केले आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू आहे. ही पदे भरल्यानंतर रुग्णांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. डी. आरसूूळकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
प्रश्न : जिल्हा रुग्णालयात सध्या किती पदे मंजूर आहेत व किती रिक्त आहेत? रिक्त पदे भरण्यासाठी काय प्रयत्न केले?
उत्तर :मी अलिकडेच जिल्हा रुग्णालयाचा कारभार हाती घेतला आहे. रिक्त पदे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हा रुग्णालयाची समस्या आहे. केवळ याच रुग्णालयात नव्हे तर राज्यातील अन्य रुग्णालयांतही प्रथम व द्वितीय श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. जिल्हा रुग्णालयाकडूनही रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यात इच्छुक डॉक्टर्सच्या मुलाखतीही शासकीय स्तरावर आरोग्य खात्याकडून घेण्यात आल्या. मात्र, पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स अद्यापही उपलब्ध झालेले नाहीत. जिल्हा रुग्णालयात प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजूर पदे ही १९ आहेत. त्यातील केवळ चार पदेच भरलेली असून, १५ पदे रिक्त आहेत. श्रेणी २ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजूर पदे ३० असून, चार पदे रिक्त आहेत. प्रथम श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. त्यासाठीच जिल्हा रुग्णालयात शासनाच्या योजनेनुसार नवीनच एम. बी. बी. एस. झालेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण देण्याच्या योजनेतून ४ प्रशिक्षित उमेदवार घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे वर्ग १ ते ४ मधील ४०८ पदे मंजूर असून, ३०६ पदे भरलेली आहेत तर १०२ पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये वर्ग १ ते ४ मधील ४१६ पदे मंजूर असून, त्यातील ३१० पदे भरली आहेत तर १०६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत जिल्हा रुग्णालय तसेच लोकप्रतिनिधींमार्फत राज्यशासन, आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक यांच्याकडे मागणी करून त्याचाही पाठपुरावा केला जात आहे.
जिल्हा रुग्णालय हे मंडणगड, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, रायपाटण व पाली ही आठ ग्रामीण रुग्णालये तसेच दापोली, कामथे, कळंबणी ही तीन उपजिल्हा रुग्णालये, रत्नागिरीचे प्रादेशिक मनोरुग्णालय, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७८ उपकेंद्र यांच्या साखळीने परस्परांशी जोडलेले आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातही नगर परिषद दवाखाने कार्यरत आहेत. या सर्व रुग्णालयांमार्फत रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
प्रश्न : जिल्हा रुग्णालयात आपली सर्वाधिक मोठी समस्या काय आहे?
उत्तर :प्रथम श्रेणीतील तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता ही मोठी समस्या आहे. कारण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट हे महत्वाचे तज्ज्ञ बऱ्याच काळापासून उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण होतात. ही तज्ज्ञसेवा खासगी डॉक्टर्सकडूून घ्यावी लागते. शस्त्रक्रीयेसाठी या खासगी सेवा देणाऱ्या तज्ज्ञांच्या वेळेनुसार थांबावे लागते. त्यामुळे ही महत्वाची पदे आधी भरण्यात यावीत यासाठी आम्ही कोल्हापूर विभागाकडे गेल्या काही दिवसात सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागाने जिल्हा रुग्णालयास महिन्यातून १५ दिवस भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचे कबुल केले आहे. ही सेवा लवकरच मिळेल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरीत देणे शक्य होईल.
प्रश्न : रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडते का? त्यासाठी काही उपाय योजले जातात काय?
उत्तर :खूप मोठ्या प्रमाणात जिल्हावासिय जिल्हा रुग्णालयात आजारांवर औषधोपचारासाठी विश्वासाने येतात. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे दाखल करून घेण्यास बेडस्ची संख्याही अपुरी पडत आहे. सध्या रुग्णालयात २०० बेडस् असून, दररोज दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या २५० ते २८० एवढी सरासरी असते. त्यामुुळे या रुग्णांना जमिनीवर बेड टाकून उपचार दिले जात आहेत. रुग्णालयाच्या आवारात आणखी १०० बेडस्च्या रुग्णालयाची विस्तारित इमारत उभारली जात आहे. त्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर दाखल होणाऱ्या रुग्णांना या उपलब्ध बेडस्ची संख्या पुरेशी ठरेल.
प्रश्न : जिल्हा रुग्णालयात अन्य वैद्यकीय सुविधा कोणत्या दिल्या जात आहेत व त्यांची सद्यस्थिती काय आहे? नवीन अपेक्षित सुविधा कोणत्या?
उत्तर :जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अद्ययावत सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार रक्तविघटन केंद्राचे काम योग्यरित्या सुुरू आहे. सोनोग्राफीची सुविधाही उपलब्ध आहे. विशेष नवजात शिशू कक्ष दोन महिन्यात उपलब्ध होणार आहे. त्याचे काम सुरू आहे. ब्लड आॅन कॉल ‘जीवन अमृत योजना’ ७ जानेवारी २०१४पासून कार्यान्वित आहे. दापोली, कामथे उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवण केंद्रही सुरू आहेत. विविध आजारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठाही रुग्णालयात उपलब्ध आहे. आयुर्वेदिक विभागही रुग्णालयात सुरू करण्यात आला असून, त्याचा रुग्ण लाभ घेत आहेत. या सुविधा सहकारी डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या सामुहिक कामातून रुग्णांना मिळत आहेत.
- प्रकाश वराडकर