इतिहास जागवायलाच हवा : श्रीधर थत्ते
By admin | Published: February 23, 2015 09:47 PM2015-02-23T21:47:27+5:302015-02-24T00:01:08+5:30
तिन्ही संस्कृतीचा इतिहास शिकवतो एकता
परशुराम मंदिर एक हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात येण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी चंद्रराव मोरे यांनी पाखाडीचा मार्ग बांधला. याच मार्गाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज दोनवेळा घोड्यावरुन परशूरामला आल्याची नोंद आहे. येथे आल्यानंतर त्यांनी होमहवन व यज्ञयाग केला होता. त्यानंतरच्या काळात निजामाच्या राजवटीत मंदिरावर हल्ला झाला होता. यावेळी मंदिरातून लाखो भ्रमर बाहेर येऊन तो हल्ला त्यांनी परतवला होता. हे दृश्य पाहताच निजामाची श्रद्धा परशुरामांवर बसली. त्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामींच्या काळात जीर्णोद्धार झाला. त्यावेळी निजामाने मोठ्या प्रमाणावर मंदिरांच्या जीर्णाेद्धारासाठी मदत केली. हिंदूंचे मंदिर, ख्रिश्चन कारागीर व इस्लामचा पैसा यामुळे या मंदिरावर या तिन्ही संस्कृ तीची छाप कायम होती. ब्रह्मेंद्र स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्वामी हे पेशव्यांचे गुरु असल्याने त्यांनी परशुराम देवस्थानला साडेतीन गावे इनाम मिळवून दिली. त्यामध्ये परशुराम, रायगड जिल्ह्यातील टोळ, आमडस व देवाचे गोठणे अर्धे अशा गावांचा यात समावेश आहे. आज परशुरामची रचना भौगोलिकदृष्ट्या बदलत असली तरी या भागाचा इतिहास व लोकप्रियता कायम आहे. देवस्थानावर काम करीत असताना अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. नवीन पिढीने या क्षेत्राला भेट देऊन हा इतिहास वाचला पाहिजे, असे मला वाटत असल्याचे थत्ते यांनी सांगितले.
परशुराम क्षेत्राला जागतिक स्तरावर पुढे नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या परिसरात अनेक वर्षे राहिल्यानंतर याठिकाणी असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमीवर काही ठिकाणे विकसीत केल्यास त्यातून पर्यटकांचा ओघ वाढेल. जांभूळदऱ्या, सवतसडा, वझर, दीपमाळ, ब्रह्मेंद्र स्वामिनी, साधना केलेले दत्त मंदिर, देवाची बाग या ठिकाणांना ऐतिहासिकता ठेवून नवा लूक देण्याचा प्रयत्न व्हावा. त्यातून मानसिक समाधान मिळेल.
कोकणामध्ये दीर्घकाळ चालत आलेल्या वनौषधींची लागवड अत्यावश्यक आहे. वर्षानुवर्षे एखाद्या रोगावर रामबाण उपाय म्हणून याचा वापर केला जायचा. ही परंपरा आजच्या युगात कायम राहावी, यासाठी निसर्गसंपन्न कोकणचा विशिष्ट भाग आयुर्वेद जपणाऱ्या वनस्पतींची लागवड करणारा असावा, असे आपले ठाम मत आहे. वैद्य, गावोगाव हिंडणारे वैदू, वनस्पतींची माहिती असणारे मात्र कोणतीही पदवी हाती नसणारे अनेकजण या भागात आहेत. या सर्वांना प्रोत्साहन देणारी ही कला कायम राहावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी आपली इच्छा आहे.
श्री क्षेत्र परशुराम याठिकाणी अनेक संत महात्म्यांचा सहवास लाभला. त्यामध्ये परमपूज्य श्रीधर स्वामी, पाचलेगावकर महाराज, भाऊ महाराज राऊळ, गजानन महाराज, स्वामी गंगानंद, शिवपुरी येथील गजानन महाराज, भाऊ महाराज चिंदरकर, स्वामी शामानंद, यती नारायणानंद या सर्वांच्या सेवेची संधी मिळाली. त्यातून नारायणानंद सरस्वती यांनी वनस्पतींची माहिती व आयुर्वेदोपचाराची सविस्तर माहिती दिली. त्याच आशीर्वादावर आज या भागात शिक्षण, आरोग्य, जंगल संवर्धन, वेद पठण या क्षेत्रात काम करता येते आहे. हा आनंद काही औरच आहे.
या भागात वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास त्याचा फायदा पर्यावरण संवर्धन व दीर्घ आजारांवर होईल. मानवतेच्या भूमिकेतून या गोष्टी करण्याकडे आपला कल राहणार आहे.
आपला मूळ पिंड शिक्षकाचा मग याकडे कसे वळलात?
- परशुराम क्षेत्री राहात असल्याने अनेक महंतांनी या भागाला भेट दिली. यातून मुळातच शिक्षकी पेशा असल्याने ज्ञानदान व ज्ञान संवर्धन या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील, याची पूर्ण कल्पना होती. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले व त्यातूनच परशुरामवासीयांनी आपल्यावर विश्वास टाकला. शिक्षक असलो तरी समाजसेवेचा पिंडही आपसूक आलाच. त्यातूनच या भागातील अनेक संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली.
कोणत्या संस्थांवर काम केले?
- परशुराम ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्षे सरपंच म्हणून काम करता आले. या काळात पाच बालवाड्या, एक पाळणाघर, पायरवाडीकडे जाणारा रस्ता, पाणी, वीज व परिसरातील सर्व विहिरींचे शुद्धीकरण हा उपक्रम राबवला व त्यातून मानसिक समाधान मिळवले. भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे संस्थापक या नात्याने तालुका व तालुक्याबाहेरील अनेक संस्थांवर काम करावे लागले. मात्र, माझा शिरस्ता मी मोडला नाही. खेड तालुका नूतन विद्यालय, लोटे, गुहागर तालुक्यातील पालपेणे, चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पेढे, काळुस्ते, खांदाट पाली माध्यमिक शाळा या सर्व शाळांना अनुदान मिळेपर्यंत मदत करण्याचे धोरण स्वीकारले. ज्या शाळा किंवा संस्था आपण सुरु केल्या, त्या संस्थांवर कोणताही अधिकार राखून ठेवला नाही. म्हणूनच आजही या संस्थांमध्ये कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला आपला सहभाग राहतो.
समाज सेवा करताना अन्य पदांवरही काम करावे लागले. सरकारच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी या पदावर सलग वीस वर्षे काम केले. परशुराम देवस्थान जीर्णाेद्धार कार्यकारी मंडळावरही विश्वस्त म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करता आले. हे सारे करीत असताना काही नवीन उपक्रम राबवावेत, असे मनात ठरवून गेली २५ वर्षे या भागात काम करीत आहे. परशुराम या भागात सध्या जीर्णाेद्धाराचे काम सुरु आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामेही हाती घेतली जात असतात. या भागात मुख्य प्रश्न कसे सुटतील, याकडे लक्ष देताना काही मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. त्यावर गांभीर्याने निर्णय घेतले गेले पाहिजेत.
धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात अन्य सुविधाही होणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम केले, त्या क्षेत्रात नवीन करण्याची उमेद आहे. त्यादृष्टीने जाणकार आणि अनुभवी शिक्षणतज्ज्ञांशीही बोलणी सुरु आहेत. आजच्या पिढीने ज्ञानाच्या कक्षा रुंदावयाच्या असतील तर वाचन वाढवले पाहिजे. टी. व्ही. व मोबाईलपासून विद्यार्थ्यांनी लांब राहिले पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळ व व्यायाम यादृष्टीने येथे तशी साधने उपलब्ध झाली तर त्यातून विद्यार्थ्यांची मानसिकताही हळूहळू तयार होईल. या ठिकाणी अशा पद्धतीचे संस्कार केंद्र सुरु झाले तर त्यातून विद्यार्थीच नव्हे; तर ज्यांची संस्कृतीवर श्रद्धा आहे त्या सर्वांनाच त्यातून पाठबळ मिळणार आहे.
- धनंजय काळे
थेट संवाद